महाराष्ट्र शाहीर हा केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट उद्या सर्वत्र प्रदर्शित होत आहे. गेल्या वर्षी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली तेव्हा शाहिरांच्या गेटअप मधील अंकुश चौधरीचा एक फोटो प्रकाशित करण्यात आला. तेव्हा अंकुशला पाहून हा चित्रपट नेमका कसा असेल याबाबत उत्सुकता निर्माण झाली. चित्रपटातील बहरला हा मधुमास नवा, गाऊ नको किसना ही गाणी प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहेत. एवढंच नाही तर साता समुद्रापार असलेले परदेशी कलाकार ह्या गाण्यांवर रिल्स बनवताना दिसू लागले आहेत. महाराष्ट्र शाहीर चित्रपटाला प्रेक्षक खूप चांगला प्रतिसाद देतील असा विश्वास कलाकारांना तसेच केदार शिंदेला देखील आहे.

शाहिरांचा जीवनप्रवास चित्रपटातून उलगडावा, त्यांचे नाव पुसले जाऊ नये या हेतूने केदारने चार वर्षांपूर्वी चित्रपटाची योजना आखली होती. मित्र अंकुश चौधरीला देखील त्याने चित्रपट बनवत असल्याची कल्पना सांगितली. मात्र दीड वर्षांपूर्वी जेव्हा तू शाहीर करतोएस असं जेव्हा अंकुशला सांगण्यात आलं. तेव्हा त्याची प्रतिक्रिया अशी होती की, मला हे पचवायलाच वेळ गेला की मी शाहीर कसा दिसेल. एक बेसूर मुलगा, नेहमी बाबांच्या मागे उभा राहणारा. त्यांच्या बरोबर जय महाराष्ट्र गात असताना मी त्वेषाने गायला लागलो. तेव्हा ते माझ्याकडे नेहमी बघायचे. कारण मी अतिशय बेसूर गात होतो. पण मी परत भानावर यायचो आणि फक्त तोंड उघडून हातवारे करायचो जणू मीच हे गाणं गातोय असं दाखवायचो. हे सगळं मी करायचो, मला अजूनही आठवतं.

तिथून आतापर्यंतचा प्रवास केदारला काय असं वाटलं माहीत नाही. पण दीड वर्षांपूर्वी केदार मला येऊन म्हणाला की तू करतोयस. जेव्हा गेटअप तयार झाला तेव्हा मी आरशासमोर होतो. जेव्हा मी स्वतःला बघितलं तर मागे केदारच्या डोळ्यात पाणी होतं. माझ्या डोळ्यात पाणी होतं, तिथं जेवढी लोकं मागे उभी होते त्यांनी बाबांना बघितलं होतं, त्यांच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. तर मला असं वाटतं तिथूनपासूनचा आतापर्यंतचा प्रवास २८ एप्रिलला चित्रपट रिलीज होईल तर प्लिज तुम्ही थिएटरला जाऊन बघा आणि त्याचा एक वेगळा अनुभव घ्या. महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट शाहीर साबळे यांचा जीवनपट आहे. शाहिरांच्या सहवासात आताच्या घडीला लोकप्रियता मिळणारे खुपसारे कलाकार घडले.
शाहिरांसोबत या प्रत्येकाच्या काही खास आठवणी आहेत. भरत जाधव यांचीही सुरुवात शाहीर साबळे यांच्या सहवासात झाली होती. १९८५ साली जेव्हा भरत जाधव नोकरीच्या शोधत होते तेव्हा घरच्यांना काळजी वाटत होती. पण मी शाहिरांकडे आहे असे कळल्यावर ते निश्चिंत होत होते. आमच्या घरच्यांना देखील त्यांच्याबद्दल आपुलकी होती. आज मी जो काही उभा आहे ते फक्त शाहीर साबळे आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांच्या आशीर्वादावरच. आम्हाला आजोबा माहीत नव्हते कसे दिसतात पण शाहिरांमुळे मला ते अनुभवता आले.