मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सिजनचा विजेता शिव ठाकरे हिंदी बिग बॉसच्या घरात जाऊन प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहे. आजवर त्याच्या वागण्याने मराठी प्रेक्षकांनाच नाहीत तर देशभरातील प्रेक्षकांना त्याने भुरळ घातली आहे. शिव समंजस आहे आणि त्याचा खेळातील उत्स्फूर्त सहभाग पाहून त्याला लोकांनी पसंती दिली आहे. नुकतेच या घरातून शिवचा मित्र अब्दु रोझीक याने घरातून एक्झिट घेतली, त्यावेळी शिवला आपले अश्रू लपवता आले नव्हते. निम्रीत आणि साजिद सोबतही जुळलेली त्याची निखळ मैत्री सगळ्यांनी पाहिली. दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली.
सिमी गरेवाल यांनी घरातील सदस्यांना प्रश्न विचारून बोलतं केलं. यात शिव ठाकरेला सुद्धा त्यांनी एक प्रश्न विचारला. तुझ्या समोर दोन प्लेट आहेत एकामध्ये धन, संपत्ती, यश आहे आणि दुसऱ्या प्लेटमध्ये आहे स्वप्नातली सुंदरी. तू काय निवडशील? यावर शिव म्हणतो की मी यश निवडेल. पण मग त्या मुलीचं काय होईल? यावर शिव भावुक होतो आणि म्हणतो की, मी घरातून खूप मोठी स्वप्नं घेऊन निघालो आहे. जर दुसरा पर्याय मला कधीच नाही मिळाला तरी काही हरकत नाही. त्याशिवाय मी माझं जीवन घालवू शकतो. आयुष्यात आपली सुद्धा काही स्वप्नं आहेत ती सत्यात उतरवण्यासाठी मी खूप मेहनत घेतोय. आयुष्यात एका मोठ्या पडद्यावर मला झळकायचं आहे, सगळीकडे माझी पोस्टर्स लागली पाहिजेत.
असा एक चित्रपट माझ्यावर बनवला जावा ज्यात मी टर्न करताना पब्लिकने म्हणायला पाहिजे की हा आहे आपला कॉमन मॅन. एका मोठ्या स्क्रीनवर एक मोठा कलाकार म्हणून झळकण्याचं माझं एक स्वप्न आहे. हे स्वप्न कधी पूर्ण होईल की नाही माहीत नाही. पण ही माझी ईच्छा आहे आणि यासाठी मी खूप प्रयत्न करतोय असे शिव ठाकरे दिलखुलासपणे म्हणताना दिसतो. शिवने व्यक्त केलेली ही इच्छा पूर्ण होईल असा विश्वास त्याच्या चाहत्यांना सुद्धा आहे. शिव ठाकरे जसा आहे तसा तो बिग बॉसच्या घरात राहण्याचा प्रयत्न करतो आहे. मात्र या घरात प्रसिद्धी मिळवत असताना त्याला अनेकांचा विरोध देखील सहन करावा लागला आहे. दोन आठवड्यापूर्वी विकेंड वॉर मध्ये शिव ठाकरेने विकास मानकतला याचा निळ्या रंगाचा कोट घातला होता.
तेव्हा विकासच्या पत्नीने शिववर कोट चोरल्याचा आळ घेतला होता. ट्विटरवर एक ट्विट करता विकासच्या पत्नीने शिववर हा आरोप लावला. त्यानंतर तिने हे ट्विट डिलीट केलेले पाहायला मिळाले. खरं तर आयोजकांच्या टीमने ही चुकी केली असल्याचे लक्षात आल्यावर शिव ठाकरेच्या बाजूने अनेक लोकांनी बोलण्यास सुरुवात केली. विकासला आणि त्याच्या पत्नीला देखील त्यांनी अगोदर सर्व गोष्टी जाणून घ्याव्या मगच आरोप लावावेत अशी कानउघडणी केली होती. त्यानंतर आयोजकांनी विकासचा कोट त्याच्या घरी पोहोचता केला ही बाब त्याच्या पत्नीने पुन्हा एकदा ट्विटरवर शेअर केली होती.