झी मराठीवरील तू तेव्हा तशी या मालिकेला नुकताच एक धक्कादायक ट्विस्ट मिळाला आहे. अनामिका आणि सौरभच्या लग्नाची तयारी सुरू झाली असतानाच, अनामीकाच्या पहिल्या नवऱ्याची या मालिकेत दमदार एन्ट्री होणार आहे. ही भूमिका अशोक समर्थ यांनी निभावली आहे. त्यामुळे अनामिका आणि सौरभच्या लग्नात विघ्न आलेले पाहायला मिळणार आहे. मालिकेत अशीच एक भूमिका साकारणारा हितेन हा देखील विरोधी पात्र बजावताना दिसत आहे. राधा आणि नीलच्या प्रेमकहाणीत तो आडकाठी ठरत असल्याने प्रेक्षकांच्या टीकेला त्याला सामोरे जावे लागत आहे. ही भूमिका साकारली आहे विकास वर्मा या कलाकाराने.
विकास वर्मा हा हिंदी मालिका अभिनेता आहे. अनुपम खेर यांच्या ऍक्टिंग स्कुलमधून त्याने अभिनयाचे धडे गिरवले आहेत. कुमकुम भाग्यविधाता, ये रिश्ता क्या केहलाता है, सावधान इंडिया, मेरे साई या हिंदी मालिकेमधुन तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विकास वर्मा लहान असल्यापासूनच स्वप्नील जोशीचा फॅन आहे. स्वप्नीलने उत्तर रामायण मालिकेतील साकारलेला कुश त्याला खूपच भावला होता. आपणही अशीच भूमिका करायची असे त्याचे स्वप्न होते. मात्र पुढे जाऊन त्याच्याच सोबत काम करण्याची संधी मिळेल याचा विचार देखील त्याने कधी केला नव्हता. तू तेव्हा तशी या मालिकेमुळे विकासला मराठी मालिकासृष्टीत झळकता आले आणि स्वप्नील सोबतही काम करता आले.
या मालिकेमुळे आणि हितेनच्या पात्रामुळे मला मोठी प्रसिद्धी मिळाली असे विकास नेहमी म्हणतो. आपल्या या यशाच्या प्रवासात मात्र तो आपल्या आईला खूप मिस करतो. विकासच्या आईला जाऊन दोन दशके लोटली आहेत. आईसोबतच्या आठवणींना उजाळा देताना त्याने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. आईचा एक फोटो शेअर करून विकास म्हणतो की, आई तुला जाऊन आज २० वर्ष झाली. मी तुझ्याशी संबंधित आजवर कधीच काही टाकले नाही. मला खात्री आहे की, तू जिथे कुठे असशील तिथून तू आम्हाला पाहत आहेस. मला मोठे होताना पाहून तुला आनंद झाला असेल. मला काम करताना पाहणे आणि मला टीव्हीवर पाहणे हे खरे तर तुझे स्वप्न होते.
तू मला ‘आलू’ म्हणायची, पण तू सोडून गेल्यानंतर मला आजही तू हाक दिल्याचा भास होतोय. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणी तुझी आठवण येते. तू आज असायला हवी होती, मला टीव्हीवर पाहून तुला माझा अभिमान वाटत असे. मी आयुष्यभर तुला कसे मिस करणार आहे. पण तुझ्या आठवणी नेहमी आशीर्वादाच्या रूपात माझ्यासोबत असतील. तुझी प्रत्येक आठवण कायम माझ्यासोबत असणार आहे आई.