झी मराठी वाहिनीवरील तब्बल ४ मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. मन उडू उडू झालं ही मालिका लोकप्रियतेच्या यादीत असतानाच या मालिकेने अचानकपणे एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला. मालिकेचे मुख्य कलाकार अजिंक्य राऊत आणि हृता दुर्गुळे त्यांच्या आगामी चित्रपट निमित्त व्यस्त आहेत. या व्यस्त शेड्युलमधून मालिकेला वेळ देता येत नसल्याने त्यांनी यातून काढता पाय घेतलेला पाहायला मिळाला. अर्थात प्रेक्षकांनी देखील त्यांच्या या निर्णयाचे स्वागतच केलेले पाहायला मिळत आहे. पाणी घालून कथानक वाढवण्यापेक्षा ती वेळेतच संपवली तर प्रेक्षक देखील नाराज होणार नाहीत अशी एक भूमिका जाणकार प्रेक्षक नेहमी घेत असतात.
याच विचाराला अनुसरून मालिकेचा शेवट गोड करण्यात आला आहे. मन उडू उडू झालं या मालिकेत दिपू आणि इंद्राच्या प्रेम कहाणीचा संघर्ष पाहायला मिळाला. त्यांचे निस्सीम प्रेम पाहून अखेर देशपांडे सरांनी नमते घेत इंद्रा आणि दिपूच्या लग्नाला परवानगी दिली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मालिकेत लग्नसोहळ्याचा थाट पाहायला मिळत आहे. लग्नाची लगबग सुरू असतानाच त्यांच्या मेहेंदी आणि हळदीचा सोहळा रंगलेला पाहायला मिळणार आहे. हळदीच्या सोहळ्यात इंद्राच्या कुटुंबीयांनी डान्स करत धमाल उडवून दिलेली पाहायला मिळत आहे. मालिकेचे संपूर्ण शूटिंग नुकतेच पार पडले आहे. यावेळी इंद्राचा लग्नातला नवरदेवाचा लूक देखील समोर आला आहे.
दाक्षिणात्य स्टाईलमध्ये इंद्राचा लूक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. मात्र आता दीपिकाचा लग्नातला लूक कसा असणार याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. येत्या २४ जुलै रोजी झी मराठी वाहिनीवर मालिकांचे एक तासांचे विशेष भाग प्रसारित होत आहेत. संध्याकाळी ७ वाजता मन उडू उडू झालं या मालिकेतून इंद्रा आणि दिपूच्या लग्नसोहळ्याचा थाट पाहायला मिळणार आहे. रात्री ८ वाजता माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका टेलिकास्ट केली जात आहे. तर रात्री ९ वाजता बँड बाजा वरात हा रिऍलिटी शो एक तासाच्या विशेष भागासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
त्यामुळे महारवीवारचे हे विशेष भाग प्रेक्षकांची उत्सुकता वाढवताना दिसत आहेत. मन उडू उडू झालं या मालिकेच्या जागी येत्या १५ ऑगस्टपासून तू चाल पुढं ही नवी मालिका प्रसारित होत आहे. अश्विनी वाघमारे हिच्या स्वप्नांची ही कहाणी दीपा परब आपल्या अभिनयाने या मालिकेतून साकारताना दिसणार आहे. तुर्तास मन उडू उडू झालं या मालिकेतील इंद्रा दिपूच्या लग्नसोहळ्याने मालिकेचा घसरलेला टीआरपी निश्चितच वाढताना दिसणार आहे.