स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतील चिमुकली स्वरा स्वराज बनून आपल्या बाबांचा शोध घेत आहे. यासाठी ती मुंबईत दाखल झाली आहे. हे दोघेही साई बाबांच्या मंदिरात एकत्रित गाणं गाताना दिसले. स्वरा मल्हार समोर आली असली तरी हेच तिचे बाबा आहेत हे अजून तिला समजलेले नसते. त्यामुळे स्वराचा शोध अजूनही सुरूच राहणार आहे. तिकडे मल्हारसोबत वाद झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी मोनिका आणी पिहू घरी परतले आहेत. मात्र मोनिका आता गेस्ट रूममध्ये राहणार असल्याचे कळल्यावर घरातील सर्वचजण आश्चर्य व्यक्त करताना दिसतात. स्वरा एका टेम्पोमध्ये लपून बसलेली असते, यात एका महिलेचे सामान ठेवलेले असते.
हे सामान उतरवून घेण्यासाठी ती टेम्पोच्या चालकाचा शोध घेते आणि त्याच्या नावाने आरडाओरडा करते. मात्र या बाईला पाहून स्वरा खूपच घाबरते. ही बाई मामींपेक्षा खूप डेंजर आहे असा ती समज करून घेते. ती बाई म्हणजेच रंजना टेम्पोत बसून आपल्या घरी येते. तिथे आल्यावर खानावळ सुरू करायला वेळ होऊ नये म्हणून ती तिच्या नवऱ्याला वसंतला हाका मरते. तेव्हा वसंत टेम्पोमध्ये असलेले सामान खाली उतरवायला जातो तेथे त्याला स्वरा दिसते. स्वराच्या हाताला लागलेले पाहून वसंत तिला डॉक्टरांकडे घेऊन जातो. आणि घरी आल्यावर रंजनाला कळू नये म्हणून स्वराला बेडखाली लपवतो. मालिकेत रंजनाच्या भूमिकेत महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात दिसत आहे. स्वरा आता स्वराज बनून रंजनाच्या घरात दाखल झाली आहे.
त्यामुळे रंजनाकडे ती सुरक्षित राहील अशी मालिकेच्या प्रेक्षकांना अपेक्षा आहे. मालिकेत वनिता खरात हिने खानावळ चालवत असलेल्या रंजनाची भूमिका निभावली आहे. सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. रानबाजार या वेबसीरिजमध्ये वनिताने कॉन्स्टेबल सरिता सानपची भूमिका साकारली होती. कबीर सिंह या बॉलिवूड चित्रपटात वनिता झळकली आहे, यात तिने पुष्पाची भूमिका साकारली होती. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमुळे वनिताने विविधांगी भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. मालिकेत वनिताला महत्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. ती स्वराला योग्य ती मदत करेल आणि तिची काळजी घेईल असा विश्वास मालिकेच्या प्रेक्षकांना आहे.