शरद केळकरने बॉलीवूड, मराठी, टॉलिवूड, कॉलीवूड चित्रपटांसह दूरचित्रवाणी मालिका, वेब मालिका मधून काम केले आहे. बाहुबली चित्रपटात डबिंग आर्टिस्ट म्हणून जबाबदारी संभाळल्याने त्याचे मोठे कौतुक करण्यात आले होते. २०२० मध्ये त्याने तान्हाजी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रचंड गाजली होती. प्रेक्षकांकडून या भूमिकेसाठी त्याचे खूप कौतुक झाले होते. उत्तरायण या चित्रपटातून शरदने मराठी सृष्टीत पाऊल टाकले होते. चिनू, पेइंग घोस्ट, संघर्ष यात्रा, यंग्राड, माधुरी अशा मराठी चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला. लई भारी या चित्रपटात त्याने साकारलेला खलनायक तेवढाच दमदार वाटला.
बऱ्याच प्रतीक्षेनंतर शरद पुन्हा एकदा मराठी चित्रपटात झळकणार आहे. मात्र यावेळी तो मूख्य नायकाची भूमिका बजावताना पाहायला मिळणार आहे. रेनबो या आगामी मराठी चित्रपटाचे शूटिंग नुकतेच सुरू करण्यात आले आहे. या चित्रपटात शरद केळकर सोबत मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची नायिका म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. सोनाली आणि शरद केळकर या दोघांची जोडी प्रथमच या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन क्रांती रेडकर करणार आहे तर अक्षय बरदापुरकर आणि राजीव अगरवाल यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. सोनाली कुलकर्णी सध्या तमाशा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
या चित्रपटात तिने एक गाणं देखील गायलं आहे. येत्या १५ जुलै रोजी तमाशा हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. सध्या सोनाली चित्रपटातून चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. झिम्मा, पांडू, तमाशा या एका पाठोपाठ एक येणाऱ्या चित्रपटानंतर तिच्या रेनबो या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. नुकतेच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली असून क्रांती रेडकर या कलाकारांना सिन समजावून सांगताना पाहायला मिळाली आहे. रेनबो या आगामी चित्रपटात शरद केळकर आणि सोनाली कुलकर्णी यांच्यासोबत उर्मिला कोठारे, ऋषी सक्सेना, चिन्मई सुमित, अमृता संत ही संपूर्ण टीम महत्वाची भूमिका साकारणार आहे.