फुलपाखरू, मन उडू उडू झालं अशा मोजक्याच मालिका साकारून हृता दुर्गुळेने आपल्या सहज सुंदर अभिनयाने एक स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केले आहे. इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारी मराठी अभिनेत्री म्हणून हृताने मान पटकावला आहे. तरुणांची क्रश असलेली लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि दिग्दर्शक प्रतीक शाह यांचा आज १८ मे २०२२ रोजी विवाह संपन्न झाला आहे. कुठलाही गाजावाजा न करता हृता आणि प्रतीक यांनी मोजक्या मित्रमंडळींना आमंत्रित करून हा लग्नाचा सोहळा साजरा केला आहे. हृता आणि प्रतिकच्या लग्नसोहळ्याचे काही खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
लग्नाच्या या मंगल प्रसंगी या दोघांवर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. हृताच्या लग्नसोहळ्यात सोनेरी पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली पाहायला मिळाली. या साडीमध्ये हृताचा लूक अधिकच खुलून दिसत आहे. तर प्रतिकने सफेद रंगाच्या ड्रेसला प्राधान्य दिलेले पाहायला मिळाले. हृता आणि प्रतीक यांचा लग्नाचा सोहळा अतिशय थाटात पार आहे. हृताने गळ्यात मंगळसूत्र घातलेला एक फोटो सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळवत आहे. मन उडू उडू झालं या मालिकेतील कलाकारांनी हृताच्या लग्नाला हजेरी लावली होती. ऋतुराज फडके तसेच रिना अगरवाल हे कलाकार नटून थटून हृताच्या लग्नात पाहायला मिळाले.
प्रतीक शाह हा हिंदी मालिका दिग्दर्शक आहे. तसेच त्याची आई देखील मराठी तसेच हिंदी मालिका चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. त्यामुळे त्यांच्या लग्नाला हिंदी मालिका सृष्टीतील अनेक प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली होती. काही दिवसांपूर्वीच हृता दादा एक गुड न्यूज आहे या नाटकाच्या दौऱ्यानिमित्त दुबईला गेली होती. नाटकाच्या दौऱ्याहून परतल्यावर तिने प्रतीक सोबत लग्न करून आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केलेली पाहायला मिळते आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी तरी हृता आता मन उडू उडू झालं या मालिकेतून ब्रेक घेत असल्याचे निश्चित झालेले आहे. तूर्तास हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाह या नवविवाहित दाम्पत्याचे मनःपूर्वक अभिनंदन.