मराठी सृष्टीला लाभलेला एक हरहुन्नरी लेखक दिग्दर्शक म्हणून दिग्पाल लांजेकर यांची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे. अभ्यासू वृत्तीचा आणि नाविन्याची कास असलेले दिग्दर्शक आणि लेखक म्हणून आजवर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. परंतु आता प्रथमच एका तगड्या भूमिकेतून ते अभिनय क्षेत्रात दाखल होणार आहेत. फर्जंद, फत्तेशीकस्त, पावनखिंड या ऐतिहासिक चित्रपटानंतर दिग्पाल लांजेकर शेर शिवराज स्वारी अफजलखान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. शत्रूच्या जास्तीत जास्त फौजेचा आपल्या कमीत कमी फौजेनिशी, कमीत कमी वेळेत पूर्ण पराभव करण्याचा महाराजांनी आखलेला हा डाव.
येत्या २२ एप्रिल रोजी हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचा ट्रेलर ११ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची झलक यातून पाहायला मिळणार असल्याने प्रेक्षक ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. शेर शिवराज या चित्रपटातून दिग्पाल लांजेकर परवली बहिर्जी नाईक हे ऐतिहासिक पात्र साकारताना दिसणार आहेत. ‘शिवबा राजं..’ हे चित्रपटातील गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं दिग्पाल लांजेकर यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. दिग्पाल लांजेकर यांच्या लेखनाची आणि दिग्दर्शनाची जादू चित्रपट तसेच मालिकांमधून पाहायला मिळाली आहे. आता प्रथमच त्यांच्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना मोठ्या पडद्द्यावरून अनुभवायला मिळणार आहे.
त्यामुळे दिग्पाल लांजेकर यांच्यासाठी हा चित्रपट खूपच खास ठरणारा आहे. शेर शिवराज या चित्रपटाला भली मोठी स्टार कास्ट लाभली आहे. चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत झळकणार असून अफजल खानाच्या भूमिकेत बॉलिवूड अभिनेता मुकेश ऋषी झळकणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मुकेश ऋषी यांचे मराठी सृष्टीत पदार्पण होत आहे. चित्रपटात वर्षा उसगावकर, अलका कुबल, मृण्मयी देशपांडे, मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी, अक्षय वाघमारे, ऋषी सक्सेना, वैभव मांगले, सचिन देशपांडे, संग्राम साळवी, अक्षय वाघमारे, आस्ताद काळे असे जाणते कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे सर्वार्थाने हा चित्रपट प्रेक्षकांसाठी देखील तितकाच खास ठरणार आहे.