टीआरपी म्हणजे ‘टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट’. मूळ कथानकात वेळोवेळी ट्विस्ट आणून मालिका अधिक रंजक कशी करता येईल याची जणू टीव्ही माध्यमातून स्पर्धाच रंगलेली असते. या स्पर्धेमध्ये जी मालिका बाजी मारेल ती त्या आठवड्याची नंबर एकची मालिका ठरवली जाते. अर्थात हा निर्णय सर्वस्वी चोखंदळ रसिक प्रेक्षकांवरच अवलंबून असतो. गेल्या अनेक वर्षांपासून झी मराठी वाहिनी या स्पर्धेत अग्रेसर ठरली होती. मात्र काही वर्षभरापासून प्रेक्षकांनी स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांना आपली पसंती दर्शवलेली दिसून येत आहे. सध्या स्टार प्रवाहवरील बहुतेक सर्वच मालिका टीआरपीच्या स्पर्धेत टॉप १० मध्ये स्थान टिकवून आहेत.
त्यात झी मराठी वाहिनीवरील ३ मालिका देखील स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवताना दिसत आहे. आई कुठे काय करते या मालिकेने गेल्या आठवड्यात प्रथम क्रमांकावर बाजी मारली आहे. या मालिकेत अरुंधतीने संजनाला कामावरून काढून टाकले. त्यामुळे अरुंधतीच्या निर्णयावर प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. संजनाला आणि कांचनला आता अद्दल घडेल हा विश्वास या मालिकेच्या प्रेक्षकांना आहे. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. रंग माझा वेगळा या मालिकेला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. रंग माझा वेगळा या मालिकेच्या ट्विस्टपुढे आई कुठे काय करते या मालिकेने बाजी मारली आहे. या दोन मालिकेपाठोपाठ सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे.
गौरीचे बदललेले रूप प्रेक्षकांना आवडले आहे. त्यात भर म्हणजे शालिनी आणि देवकी सारख्या कुरघोड्या करणाऱ्या जाऊ बाईंना ही गौरी धडा शिकवायला सज्ज झाली आहे. एवढे दिवस गौरीचा निरागसपणा आणि भोळेपणामुळे जयदीप आणि गौरीच्या नात्यात विघ्न येत होते. परंतु तिचे बदललेले हे रूप प्रेक्षकांना हवे हवेसे वाटणारे आहे. त्यामुळे या मालिकेने टीआरपीच्या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर नाव नोंदवले आहे. चौथ्या क्रमांकावर स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेने स्थान मिळवले आहे. अप्पू आणि शशांकची जोडी मालिकेतून प्रेक्षकांना भावली आहे तसेच अप्पूचा धांदरटपणा देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने नेहमीप्रमाणे पाचव्या क्रमांकावर समाधान मानले आहे. तर सहाव्या क्रमांकावर फुलाला सुगंध मातीचा आणि सातव्या क्रमांकावर स्वाभिमान शोध अस्तित्वाचा ही मालिका टॉप टेन मध्ये आपले स्थान टिकवून ठेवून आहे. विशेष म्हणजे झी मराठी वाहिनीवर नुकतीच सुरू झालेली तू तेव्हा तशी या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर यासारखे मुरलेले कलाकार मालिकेला लाभल्यामुळे ती टीआरपीमध्ये स्थान निर्माण करताना दिसत आहे. या मालिकेने आठव्या स्थानावर आपले नाव नोंदवले आहे.
तर मन उडू उडू झालं ही आणखी एक झी मराठीवरील मालिका नवव्या क्रमांकावर समाधान मानताना दिसत आहे. तर दहाव्या क्रमांकावर लग्नाची बेडी या मालिकेला समाधान मानावे लागत आहे. मुख्य म्हणजे देवमाणूस मालिकेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद तुलनेने देवमाणूस २ ह्या मालिकेला कमी मिळाला. ही मालिका टॉप १० मध्ये स्थान मिळवण्यास असमर्थ ठरली आहे. तर किचन कल्लाकार या शोला देखील प्रेक्षकांचा खूप कमी प्रतिसाद मिळू लागला आहे.