महेश कोठारे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे या कलाकारांनी मराठी चित्रपट सृष्टीला खऱ्या अर्थाने सावरण्याचे काम केले. महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेला धुमधडाका १९८५ हा पहिला मराठी चित्रपट. निवेदिता सराफ, सुरेख राणे, सरोज सुखटणकर, शरद तळवलकर, प्रेमा किरण, जयराम कुलकर्णी असे दिग्गज कलाकार चित्रपटाला लाभले. या सुपरहिट चित्रपटानंतर त्यांनी अनेक दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले. धुमधडाका या चित्रपटाचे कथानक रसिक प्रेक्षकांच्या चांगले स्मरणात आहे. या चित्रपटातून अशोक सराफ यांनी महेश कोठारे यांच्या मित्राची भूमिका साकारली होती. परंतु गौरीसोबत महेशचे लग्न जुळावे म्हणून ते यदुनाथ जवळकरच्या गेटअपमध्ये येतात.
तोंडात पाईप, हातात काठी आणि ‘वख्या विख्खी वुख्खू’ हा डायलॉग आला की हे जवळकरसाहेब डोक्यात मात्र लख्ख प्रकाश टाकून प्रेक्षकांची हसून हसून पुरेवाट लावतात. ह्या डायलॉगमागची कथा नेमकी कशी सुचली याची आठवण अशोक सराफ यांनी सांगितली आहे. सोनी मराठीवरील इंडियन आयडलच्या मंचावर अशोक सराफ यांनी हजेरी लावली आहे. यात त्यांनी या डायलॉग मागची कथा सांगितली आहे. शरद तळवळकर जेव्हा बागेत पाणी देत असतात तेव्हा अशोक सराफ यांची एन्ट्री होते. काय माळी बुवा, एवढं म्हणताच अशोक सराफ यांनी तोंडात धरलेला पाईप आत घशामध्ये अडकतो. तेव्हा तिथे त्यांना ठसका लागतो. पुढे हेच ऍडिशन घेऊन त्यांनी वख्या विख्खी वुख्खू हातवारे करून म्हणण्याचा प्रयत्न केला.
हा डायलॉग चित्रपटातून सुपरहिट झाला आणि पुढे अशोक मामांना या भूमिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. अर्थात चित्रपटातील असे ऍडिशन अजरामर होतात याची कल्पना देखील त्यावेळी कोणी केलेली नसावी. याच चित्रपटातील अशोक सराफ आणि शरद तळवळकर यांचा आणखी एक डायलॉग खूपच लोकप्रिय आहे. नवकोट नारायण अतिश्रीमंत असलेल्या जवळकरांसाठी या गोष्टी सामान्यच असतील तेव्हा ‘अतिसामान्य’ हा त्यांचा शब्दही तितकाच खोचक वाटणारा ठरतो. अशाच आणखी काही खास गमतीजमती अशोक सराफ यांनी मराठी इंडियन आयडॉलच्या मंचावरून सांगितल्या आहेत तेव्हा आजचा भाग पाहायला प्रेक्षक तितकेच उत्सुक असतील याची खात्री आहे.