केदार शिंदे, भरत जाधव, अंकुश चौधरी आणि संतोष पवार ही कलाकार मंडळी शाहीर साबळे यांच्या महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमातून प्रेक्षकां समोर आली. अंकुश चौधरी आणि केदार शिंदे हे एकाच शाळेतले विद्यार्थी. त्यामुळे शाळेत असल्यापासूनच हे दोघेही एकमेकांना चांगले परिचयाचे होते. केदार शिंदे हा शाहीर साबळे यांचा नातू त्यामुळे कलेचे गुण त्याने बालपणापासूनच अंगिकारले होते. शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमातून केदार नेहमी सहभागी व्हायचा आणि बक्षिसं मिळवायचा. याच शाळेत अंकुशने देखील आपल्या वर्गाला बक्षीस मिळवून दिले होते. पुढे नाटकातून काम करता यावे म्हणून तशाच कॉलेजची निवड या दोघांनी केली होती.
एकदा केदारने सहज म्हणून अंकुशला आपल्या आजोबांच्या लोकधारामध्ये काम करण्यासाठी सुचवले. याच लोकधारामध्ये या सर्वांची अगदी घट्ट गट्टी जमली होती. पुढे लोकधाराच्या मंचावर केदार बेलाच्या प्रेमात पडला. त्याच्या प्रेमाची ही कहाणी तेवढीच मजेशीर आहे असे म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्राची लोकधारा मध्ये बेला देखील नृत्याच्या ग्रुपमध्ये असायची. केदारला बेला आवडू लागली. पण ती मोठ्या घरातली मुलगी असल्याने ती आपल्याला होकार देईल की नाही याची केदारला शंका होती. त्यात अंकुश चौधरी सारखे मित्र गाठीशी असताना केदारने बेलाला माझ्याशी लग्न करशील का? म्हणून विचारण्याचे धाडस दाखवले. आणि तो दिवस नेमका १ एप्रिलचाच होता.
या दिवसाची आठवण सांगत केदार म्हणतात की, १ एप्रिल १९९१ रोजी दोन वर्षांची उमेदवारी केल्यावर बेला शिंदेने मला होकार दिला. अंकुश चौधरी होता माझ्या सोबत. तीला भेटून ट्रेनचा प्रवास करत आम्ही दादर पुर्वेकडील एका इराणी हॅाटेल गाठलं. चहा बनमस्का खाताना, अचानक आठवलं “आयला अंकी, मला बेलाने एप्रिल फूल तर केलं नसेल ना?” त्यावेळी मोबाईल नव्हते. त्यात तिच्या घरच्या लँडलाईनवर फोन करण्याची हिंमत अजिबात नव्हती. ती पुन्हा जोवर भेटली नाही तोवर माझ्यासाठी तीने एप्रिल फूल केलं यावर विश्वास ठेवण्या शिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण पण पण, ती त्या १ एप्रिल रोजी माझ्या आयुष्यात आली ती बेला के फूल बनून. आज १ एप्रिल घरातून निघण्याच्या आधी पुन्हा आम्ही त्या आठवणीत रमलो, अंकुश तुला मीस केलं रे.