माझी तुझी रेशीमगाठ या झी मराठी वरील मालिकेत नुकतीच जेसीकाची एन्ट्री झाली आहे. जेसीका ही यशची एक्स गर्लफ्रेंड आहे असं समीर नेहाला सांगतो. त्यामुळे समीरचा हा प्लॅन नेहा यशला प्रेमाची कबुली देण्यासाठी कितपत उपयोगी पडेल हे येत्या काही भागातूनच स्पष्ट होईल. मात्र जेसीका ही यशची गर्लफ्रेंड होती हे समजताच नेहाच्या चेहऱ्यावरचा मात्र पुरता रंग उडालेला पाहायला मिळतो आहे. जेसीका आता यशसोबतच राहत असल्याने नेहाला मात्र यश आणि जेसीका या दोघांचाही राग येत असतो. तूर्तास जेसीकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल या काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत जेसीकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव आहे जेन कटारिया. जेन कटारिया ही मॉडेल आणि रशियन, तमिळ अभिनेत्री आहे. जेन कटारिया हिने मिस इंडियाच्या सौंदर्य स्पर्धेत सहभाग दर्शवला होता. अभिनयासोबतच जेन एक रेडिओ जॉकी आहे. इको बांबू हॉटेलची ती मालकीण देखील आहे. द गोल्डन गर्ल या रिऍलिटी शोमध्ये जेनने परीक्षिकेची भूमिका बजावली होती. मुंबईत ती तिच्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहे. सध्या हिंदी आणि इंग्रजी या भाषा अवगत असलेल्या जेनला मराठी भाषा शिकाण्याची खूप उत्सुकता आहे. भाजी मंडईत गेल्यावर कांदे बटाटे असे मोजकेच मराठी शब्द तिला आता माहीत झाले आहेत.

जेनला महाराष्ट्रातली मिसळ पाव खूप आवडते नाशिकला गेल्यावर तिने पहिल्यांदा मिसळपाव खाल्ली होती. असा पदार्थ मी कुठेच खाल्ला नव्हता अशी एक गोड प्रतिक्रिया तिने मराठमोळ्या मिसळपाव बद्दल दिली आहे. यासोबतच तिला साडी नेसायला देखील खूप आवडते. साडी नेसल्यामुळे तुमच्यातला रूबाबदारपणा वाढतो असे ती म्हणते. त्यामुळे मी अनेकदा साडी नेसली आहे आणि त्या वेशात लोक माझ्याकडे उत्सुकतेने पाहत असतात. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत जेन तिच्या मुलाला सोबत घेऊन सेटवर येते. तिच्या घरात हिंदी, इंग्रजी भाषा बोलली जात असल्याने तिच्या मुलाला देखील आता हिंदी भाषा चांगली अवगत झाली आहे.
मराठी मालिकेत जेन प्रथमच काम करत असल्याने तिला इतर कलाकारांकडून खूप साहाय्य मिळते. श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे आणि संकर्षण कऱ्हाडे मला खूप सपोर्ट करतात असे जेन म्हणते. आमच्यात हळूहळू मैत्री देखील होऊ लागली असल्याचे ती सांगते. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत जेनने साकारलेली जेसीका काही दिवसांसाठीच असणार आहे. नेहाने यशला प्रेमाची कबुली द्यावी यासाठी जेसीकाचे पात्र मालिकेत दाखल झाले आहे. येत्या काही भागात मालिकेत आलेल्या या ट्विस्टमुळे प्रेक्षकांचे मात्र नक्कीच मनोरंजन होणार आहे.