झी मराठी वाहिनीवर नुकतेच दोन नवे रिऍलिटी शो प्रसारित करण्यात येत आहेत. हे तर काहीच नाय आणि किचन कल्लाकार हे नव्या दमाचे शो प्रेक्षकांची दाद मिळवताना दिसत आहेत. किचन कल्लाकार या रिऍलिटी शोमध्ये वेगवेगळ्या सेलिब्रिटींनी आमंत्रित करण्यात येत आहे. या शोमध्ये प्रशांत दामले जजच्या भूमिकेत तर संकर्षण कऱ्हाडे सूत्रसंचालन करत आहे. प्रणव रावराणे हा दुकानाचा शेठ बनला आहे. देशविदेशात अन्नपूर्णा या नावाने स्वतःचे हॉटेल व्यवसाय सांभाळणाऱ्या जयंती कठाळे पदार्थ बनवण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. आजच्या भागात अभिनेत्री प्रार्थना बेहरे, तेजस्विनी पंडित आणि आदिनाथ कोठारे दाखल झाले होते. त्यावेळी या तिघांनी प्रशांत दामले यांनी सांगितलेले पदार्थ बनवून दाखवले.
या तीघांमधून प्रार्थना बेहरेने बनवलेली पुरणपोळी प्रशांत दामलेना आवडली आणि तिला पहिल्या वहिल्या भागाचा विजेता घोषित केले. याचदरम्यान तेजस्विनीला उद्देशून प्रशांत दामले यांनी एक फोन लावला. त्या फोनवर त्यांनी तेजस्विनी अजूनही वडापाव खात नाही असे म्हटले होते. याचा नेमका अर्थ काय हेच कुणाला कळले नाही त्यावर उलगडा करत तेजस्विनीने १४ वर्षांपूर्वी घडलेली एक घटना सांगितली. तेजस्विनी जेव्हा पुण्यात राहत होती त्यावेळी तिची बहीण, मित्र मैत्रिणी सगळेजण वडापाव खायला वडगाव बुद्रुकला जायचे. वडापाव हा त्यांचा खूपच आवडता पदार्थ असल्याने, ते नेहमी त्या ठिकाणी वडापाव खायला जायचे. मात्र त्यांचा अमर नावाचा एक बेस्ट फ्रेंड १४ वर्षांपूर्वी एका अपघातात गेला. अमरला वडापाव खूप आवडायचा आणि त्याच्या आठवणीत मी आजही वडापाव खात नाही. मला त्याची चवही आठवत नाही, असे म्हणत तेजस्विनीला आपले अश्रू अनावर झाले होते.
त्यावेळी प्रशांत दामले यांनी मंचावर वडापाव मागवले आणि त्या मित्राला वडापाव खूप आवडतो मग तो तू का सोडलास, त्याच्या आठवणीत तू वडापाव खाल्ला पाहिजे असे म्हणून तिला तो वडापाव खायला लावला. १४ वर्षांपूर्वीपासून मित्राच्या आठवणीत तेजस्विनीने वडापाव खाणे सोडले होते. आणि किचन कल्लाकरच्या मंचावर तिने मित्राचीच आठवण म्हणून वडापावची चव चाखलेली पाहायला मिळाली. संजय जाधव दिग्दर्शित अनुराधा या वेबसिरीजच्या माध्यमातून तेजस्विनी मुख्य भूमिका निभावताना दिसत आहे. या वेबसीरिजमध्ये पहिल्यांदाच तेजस्वीनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकत आहे. या वेबसिरीजमध्ये तेजस्विनीसोबत सचित पाटील, सोनाली खरे, सुशांत शेलार, सुकन्या मोने, स्नेहलता वसईकर, आस्ताद काळे, विजय आंदळकर, शाल्मली तोळे हे कलाकार महत्वाची भूमिका बजावत आहेत.