सोनी मराठी वाहिनीने नव्या दमाच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनावर आधारित मालिका प्रथमच या वाहिनीने प्रेक्षकांसमोर आणली शिवाय अजूनही बरसात आहे, महाराष्ट्राची हास्य जत्रा, ऐतिहासिक स्वराज्यजननी जिजामाता या मालिकांना प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नव्याने सुरु झालेला रिअलिटी शो मराठी इंडियन आयडल आता रंजक वळणावर येऊन पोहोचला आहे.
आपल्या गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावणारी अजय अतुल यांची जोडी परीक्षकांच्या भूमीका समर्थपणे पार पडताना पाहायला मिळाली. खुद्द अजय अतुल स्पर्धकांची निवड करणार असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून दर्जेदार गायकांनी सहभाग नोंदविला. मागील काही भागात सहभागी स्पर्धकांनी प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करीत गोल्डन माईकची शान वाढवली आहे. कैवल्य केजकर, भाग्यश्री टिकले, अविनाश जाधव, शुभम खंडाळकर, अमोल सकट, ऋषिकेश शेलार, श्वेता दांडेकर, चैतन्य देवढे, आम्रपाली पगारे, जगदीश चव्हाण, अश्विनी मिठे, प्रतीक सोळसे, सागर म्हात्रे आणि सुरभी कुलकर्णी या टॉप १४ स्पर्धकांनी आपले स्थान निश्चित केले आहे. येथून पुढे प्रत्येकाला आपला सर्वोत्तम परफॉर्मन्स द्यावा लागणार आहे. सुरांची मैफिल सजवीत एक एक कलाकार यातून निरोप घेताना पहायला मिळेल; अर्थात सर्वोत्तम गायक विजयाची वाटचाल पुढे चालू ठेवणार आहेत. इंडियन आयडल हिंदी या लोकप्रिय रिऍलिटी शोची सुरुवात झाल्यावर पहिल्या सिजनच्या विजेते पदाचा मान गायक अभिजित सावंत ला मिळाला होता. गायक राहुल वैद्य हा देखील याच सिजनमधून प्रेक्षकांसमोर आला होता.
इंडियन आयडल १२ व्या सिजन मध्ये पवनदीप राजन हा विजेता झाला होता. विजेत्याला मानचिन्ह व्यतिरिक्त २५ लाख रुपये बक्षीसाची रक्कम देण्यात आली, या शिवाय एका संगीत कंपनीसोबत करार देखील केला गेला. हिंदीनंतर प्रथमच इंडियन आयडल मराठी मध्ये साकारत असल्याने प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. अजय अतुल यांच्या समोर गायकी सादर करण्याची हि मोठी संधी या सर्व कलाकारांचे आयुष्य बदलून टाकणारी ठरणार आहे. निवड फेरीमधून टॉप १४ पर्यंतची पहिली पायरी पार केलेल्या सर्व स्पर्धकांना पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.