सोनी मराठी वाहिनीवर ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ ही ऐतिहासिक मालिका १५ नोव्हेंबरपासून प्रसारित केली जात आहे. स्वराज्याची धुरा समर्थपणे पेलणाऱ्या महाराणी ताराराणी यांचा इतिहास प्रथमच टीव्ही माध्यमातून पाहायला मिळत आहे. अवघ्या एका आठवड्यातच या मालिकेने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. अर्थात महाराणी ताराराणींची भूमिका स्वरदा ठिगळे हिने तिच्या अभिनयाने उत्तम पेलली आहे हे या मालिकेचे यश म्हणावे लागेल.
महाराणी ताराराणी यांची भूमिका साकारायची म्हटल्यावर त्यासाठी सर्वस्व झोकून देणारी अभिनेत्री हवी. स्वार घोड्याच्या पाठीवर बसून घोडा दोन पायांवर उभा करणे ही महाराणी ताराराणींची प्रतिमा किंवा पुतळे पाहिली जातात असाच स्टंट साकारताना स्वरदाने घोडा दोन पायांवर लीलया उभा केला. त्यावेळी प्रत्यक्षात रणरागिणी महाराणी ताराराणी डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या असं डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वरदाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. केवळ हेच नाही तर अनेकदा मालिकेत वेगवेगळी आव्हाने पेलावी लागतात मात्र ही आव्हानं स्वीकारताना अपघातही घडतात. नुकतेच मालिकेच्या सेटवर एक साहसदृश्य करायचे होते त्यावेळी एक मोठा अनर्थ होण्यापासून कलाकार थोडक्यात बचावला. मालिकेत अभिनेते ‘अमित देशमुख’ हे सरसेनापती संताजी घोरपडे यांची व्यक्तिरेखा साकारत आहेत. सेटवर त्यांच्याबाबत नुकतीच एक घटना घडली आहे, एक व्हिडिओ शेअर करून त्यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे. इतिहास साकारण्यासाठी जिगर लागते! ऐतिहासिक मालिका म्हटलं की साहसदृष्ये आणि घोडेस्वारी या अविभाज्य गोष्टी.
पण कधी कधी सर्व खबरदारी घेऊनही अपघात घडतात आणि काळजाचा ठोका चुकतो. अचानक घोडा बिथरण्यामुळे काय प्रसंग ओढवू शकतो याचा मी स्वतः अनुभव घेतला आहे. परवा “स्वराज्य सौदामिनी ताराराणी” मालिकेच्या चित्रीकरणाच्या वेळी पुन्हा हा अनुभव आला. सरसेनापती संताजीराव घोरपडे यांची भूमिका करणाऱ्या अमित देशमुख यांचा घोडा अचानक बिथरला आणि काळजाचा ठोका चुकला. सुदैवाने मोठी दुखापत झाली नाही. परंतु मानलं अमित देशमुख यांना, पुन्हा सावरून घोड्यावर स्वार होऊन प्रसंग चित्रित केला. ऐतिहासिक भूमिका साकारण्यासाठी जिगर लागते हे अमित देशमुख यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं. मालिकेच्या टीम कडून अमित देशमुख यांचं कौतुक केलं जात आहे. ह्या साहसदृश्यात अमित देशमुख स्वार असलेला घोडा बिथरलेल्या अवस्थेत दिसत आहे त्यामुळे अमित देशमुख घोड्यावरून खाली पडतात हा सिन कॅमेऱ्यात कैद झाला आणि उपस्थितांच्या काळजाचा ठोकाच चुकला. मात्र अशा परिस्थिती देखील अमित देशमुख आपला सिन पूर्ण करतात. त्यांचे हे धैर्य आणि कामाप्रति निष्ठा पाहून मालिकेच्या टीमने त्यांचे कौतुक केले आहे.