माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील परीचे पात्र प्रेक्षकांना खूपच भावले असून तिच्या सीनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. ही भूमिका गाजवली आहे बालकलाकार “मायरा वायकुळ” हिने. मायरा अवघ्या साडेचार वर्षांची आहे पण तिचे इन्स्टाग्रामवर २ लाख ७९ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत तर युट्युबवर २ लाख ५३ हजार सबस्क्राईबर्स आहेत. आपल्या निरागस अभिनयाने मायराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. परंतु हा अभिनय करण्यासाठी मायराला तिचा सिन समजून घ्यावा लागतो यामागे ती आणि मालिकेची टीम कशी मेहनत घेते हे जाणून घेऊयात…
मायरा अवघ्या साडेचार वर्षाची असल्याने तिला स्क्रिप्ट वाचता येत नाही त्यामुळे दिग्दर्शक मायराला तिचा संपूर्ण सिन समजावून सांगतात आणि तो कसा सादर करायचा तेही दाखवतात. या कामात तिला श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे हे देखील मदत करतात. त्यामुळे सेटवर खेळीमेळीचे वातावरण निर्माण होते. सध्या शाळेतल्या मुलांना आणि खाऊच्या डब्ब्याला मायरा खूप मिस करत आहे. प्ले ग्रुप आणि नर्सरीसाठी मायरा शाळेत गेली होती त्यानंतर निर्बंध घालण्यात आल्याने ती शाळेतील गमतीजमती मिस करत आहे. त्यासाठी शाळेतील सर्व मित्रमैत्रिणी महिन्यातून एकदा कोणाच्या तरी घरी एकत्र जमतात आणि तिथे धमाल मजा मस्ती करतात. मायराने झी मराठी पुरस्कार सोहळ्यात अँकरिंग केलं होतं त्यामागे देखील पडद्या मागच्या कलाकारांची साथ तिला मिळाली होती. त्याचमुळे तिचं काम प्रेक्षकांना विशेष भावलं आहे. मायरा वायकुळने टिकटॉक व्हिडीओजच्या माध्यमातून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. टिकटॉक स्टार म्हणून तिची ओळख होती. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून मायरा छोटा पडदा गाजवत आहे. काही दिवसांपूर्वी मायराच्या आजोबांचे निधन झाले त्यावेळी आजोबांसोबतचा मायराचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला.
मायराची आई श्वेता वायकुळ यांनी एक भावनिक पोस्ट लिहून वडिलांच्या आठवणी जाग्या केल्या होत्या. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळवताना दिसली होती. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत येण्याअगोदर ‘तू एक परी’ या आगामी मराठी चित्रपटात मायराने बाल भूमिका निभावली होती. मात्र हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबत अजूनही सांगण्यात आलेलं नाही. असे असले तरी चित्रपटात चमकण्याअगोदर मायराने छोटा पडदा मात्र दणाणून सोडलेला पाहायला मिळतो. मालिकेत तिचा सीन कधी येतो याचीच प्रेक्षक वाट पाहत असतात, हीच तिच्या निरागस अभिनयाची पावती ठरली आहे.