सोनी मराठी वाहिनीवर येत्या १५ नोव्हेंबर २०२१ पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० वाजता “स्वराज्य सौदामिनी ताराराणी” ही मालिका प्रसारित केली जात आहे. महाराणी ताराराणींची महती पहिल्यांदाच प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर अनुभवता येणार असल्याने या मालिकेची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. मालिकेत महाराणी ताराराणींच्या भूमिकेत अभिनेत्री स्वरदा ठिगळे झळकणार आहे. तर या मालिकेत छत्रपती राजाराम राजेंची तितकीच दमदार भूमिका अभिनेता ‘संग्राम समेळ’ साकारणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पश्चात स्वराज्याची धुरा छत्रपती राजाराम महाराज यांनी सांभाळली होती. छत्रपती राजाराम महाराज अत्यंत पराक्रमी व मुत्सद्दी होते, स्वराज्य आत्यंतिक संकटात असताना राजाराम महाराजांनी ते सावरले. तामिळनाडूतील जिंजीवरून त्यांनी दिलेला सात वर्षांच्या लढ्यात औरंगजेबाला पुरते जेरीस आणले होते. छत्रपती राजाराम महाराज पायाळू जन्मले होते म्हणून सर्वजन चिंतित झाले असतां शिवाजी महाराजांनी हा पातशाही पालथी घालेल असे भविष्य वर्तविले. पातशहाला सतत झुंजवत ठेवून कोणतेही निर्णायक यश मिळू दिले नाही, पातशाही खिळखिळी केली अशी ही दमदार भूमिका अभिनेता संग्राम समेळ उत्तम निभावेल अशी आशा आहे. मागील काही दिवसांपूर्वी संग्राम समेळ बिग बॉसच्या घरात जाणार असल्याची चर्चा पाहायला मिळाली होती. या बातमीने संग्रामला कुठल्याच मालिकेत काम मिळत नव्हते. मी बिग बॉसच्या घरात जाणार अशा सर्व अफवा पसरल्याने मला कुठलाच प्रोजेक्ट मिळत नसल्याची खंत त्याने व्यक्त केली होती. दरम्यान आता संग्राम समेळ सोनी मराठी वाहिनीवर नव्याने दाखल होत असलेल्या मालिकेत छत्रपती राजाराम महाराजांच्या महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
लग्नानंतर त्याची प्रमुख भूमिका असलेली ही पहिली मालिका ठरणार आहे. संग्राम समेळ आणि श्रद्धा फाटक यांचे ह्या वर्षी मार्च महिन्यात लग्न झाले होते. नृत्यांगना असलेल्या श्रद्धा फाटक हिच्याशी तो विवाहबद्ध झाला होता. अभिनेता संग्रामने या आधी पुढचं पाऊल, ललित २०५, कुसुम मनोहर लेले, स्वीटी सातारकर, विकी वेलींगकर या चित्रपट, मालिका तसेच नाटकांतून काम केले आहे . संग्राम समेळला त्याच्या छत्रपती राजाराम महाराज्यांच्या या ऐतिहासिक भूमिकेसाठी खूप खूप शुभेच्छा…