बिग बॉसच्या घरात राहून वेगवेगळ्या टास्कमधून विशाल निकमने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत त्यामुळे तो बिग बॉसच्या सिजन ३ मधला एक तगडा सदस्य असल्याचे मत त्याच्या चाहत्यांनी व्यक्त केलं आहे. मधल्या काही दिवसात विकास सोबत झालेल्या वादामुळे विशालवर टीका करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही विकास आणि विशालची मैत्री प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली. विशाल निकम हा मराठी चित्रपट तसेच मालिका अभिनेता आहे. अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर विशाल जिम ट्रेनर म्हणून कार्यरत होता. फिट अँड हँडसम असे समीकरण असलेल्या विशालला त्याच्या मित्रानेच मॉडेलिंग क्षेत्रात जाण्याचा सल्ला दिला होता. इथूनच त्याचे कलाक्षेत्रात पदार्पण झाले असे म्हणायला हरकत नाही. आज विशाल निकम बद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात…

विशाल निकम हा मूळचा सांगली जिल्ह्यातील खानापूरचा. एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झाला त्यामुळे अभिनय क्षेत्राच्या कुठल्याही पार्श्वभूमीचा लवलेशही त्याला माहीत नव्हता. खानापूर येथील शाळेतून त्याचे शालेय शिक्षण झाले. पुढे भौतिकशास्त्र या विषयातून त्याने एमएस्सीची पदवी प्राप्त केली. फिटनेसची आवड पहिल्यापासूनच होती त्यामुळे मुंबईतील कांदिवली येतील प्रसिद्ध Gold’s Gym मध्ये त्याने जिम ट्रेनर म्हणून नोकरी केली. या जिममध्ये अनेक सेलिब्रिटी हजेरी लावायचे त्यामुळे आपणही चित्रपटात दिसावे अशी त्याची इच्छा होती. मित्राच्या सल्ल्याने त्याने पुढे जाऊन मॉडेलिंग क्षेत्र करिअर म्हणून निवडले. ‘Mr, Miss and Mrs Pune Global २०१८’ सिजन २ मध्ये त्याने रॅम्पवॉक केले. या क्षेत्रात आपला जम बसेल असा विश्वास वाटू लागला त्यानंतर मुंबईत राहून त्याने काही ब्रॅण्डसाठी मॉडेलिंग देखील केले. हळूहळू मॉडेलिंग क्षेत्रात जम बसवताना २०१८ साली “मिथुन” या चित्रपटात त्याला मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. अभिनेत्री अमृता धोंगडे आणि विशाल निकम हे दोघेही पहिल्यांदाच मिथुन या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आले होते. या चित्रपटातील विशालच्या भूमिकेचे कौतुक झाले त्यानंतर २०१९ साली धुमस हा दुसरा चित्रपट त्याने अभिनित केला.

मोठा पडदा गाजवल्यानंतर विशाल साता जल्माच्या गाठी, दख्खनचा राजा जोतिबा, जय भवानी जय शिवाजी, बलोच अशा मालिका आणि चित्रपटातून झळकला. या मालिकांमधून त्याच्या अभिनयाला अधिक वाव मिळत गेला. सध्या बिग बॉसच्या घरात राहून विशाल वारंवार एलिमीनेट होत असला तरी प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादामुळे तो सेफ होताना दिसत आहे. मराठी बिग बॉसचा स्ट्राँग कंटेस्टंट म्हणूनही त्याच्याकडे पाहिले जाते.