जय दुधाने हा मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनचा सर्वात महागडा कंटेस्टंट आहे. टास्क दरम्यान असो किंवा इतर वेळेस होणाऱ्या वादामुळे जय दुधाने हे नाव नेहमीच चर्चेत राहिलं आहे. त्यामुळे हा जय दुधाने नक्की आहे तरी कोण? असा प्रश्न अनेक प्रेक्षकांना पडला असेल, त्याचा इथपर्यंत येण्याचा प्रवास नेमका कसा आहे ते जाणून घेऊयात…

जय दुधाने हा वयाच्या साडेतीन वर्षाचा असल्यापासूनच खूपच ऍक्टिव्ह राहिला आहे. आईच्या प्रेरणेनेच सुरुवातीला त्याने जिम्नॅस्टिक जॉईन केले. त्यामुळे शाळा आणि बाकीच्या ऍक्टिव्हिटी करण्यात त्याचा संपूर्ण दिवस खूप व्यस्त असायचा. अगदी शाळा सुटल्यावर तिथेच कपडे बदलून तो जिम्नॅस्टिकच्या क्लासला जायचा. या धावपळीत जयची आई त्याची खूप काळजी घ्यायची. आपल्या मुलाला खायला देखील वेळ मिळत नाही म्हणून ती सोबत आणलेले काजू, बदाम, खजूर वडिलांच्या बाईकवर मागच्या बाजूला बसूनच त्याला खाऊ घालायची. मधला काळ मात्र त्यांच्या कुटुंबासाठी खूप कठीण गेला होता. आजोबांचा चांगला बिजनेस होता मात्र तरीही वाढदिवसाला सायकल घ्यायची म्हणून वर्षभरात पाचशे पाचशे रुपये जमा करून त्याच्या वडिलांनी जयसाठी सायकल खरेदी केली होती. आईचा भक्कम पाठिंबा आणि साथ मिळाली असली तरी तिने अगोदरच बजावून सांगितलं होतं की ‘तुला जे काही करायचंय ते शून्यातून उभं करायचंय, आम्ही तुला एकही पैसा देणार नाही’… आईच्या पाठिंब्यामुळे आपण काहीतरी करून दाखवावे अशी मनोमन ईच्छा जयने व्यक्त केली होती. मात्र आपण इतर मुलांसारखे मजा मस्ती करू शकत नाही, क्रिकेट खेळू शकत नाही असेही विचार कधी कधी त्याच्या मनात यायचे. याच दरम्यान वयाच्या १८ व्या वर्षी फायनान्शियली स्टेबल होऊन जिम जॉईन केलं. त्यानंतर मिक्स मार्शल आर्टसचा गेम खेळणारा महाराष्ट्रातला पहिला खेळाडू म्हणून जय दुधाने हे नाव सर्वत्र चर्चेत आलं.

त्यानंतर टेलिव्हिजन क्षेत्रात देखील पदार्पण करण्याचा त्याचा निर्णय पक्का झाला, जयने सुरुवातीला एमटीव्ही स्प्लिट्सव्हीला या रिऍलिटी शोसाठी ऑडिशन दिलं मात्र तिथे तो रिजेक्ट झाला. पुन्हा स्प्लिट्सव्हीलाच्या पुढच्या सिजनच्या ऑडिशनला बोलवलं गेलं परंतु पुन्हा हाती रिजेक्शन मिळालं. दरम्यानच्या काळात त्याने खूप मेहनत केली आणि एमटीव्ही रोडीजसाठी ऑडिशन दिलं पण पुन्हा रिजेक्शन पदरी पडले. असं ऑडिशनला वारंवार बोलावून एकामागून एक रिजेक्शन होत गेले शेवटी स्प्लिट्सव्हीला १३ साठी जयची कंटेस्टंट म्हणून निवड करण्यात आली आणि प्रेक्षकांची मने जिंकून तो या शोचा विजेता देखील ठरला. हिंदी सिनेसृष्टीत जय दुधाने हे नाव गाजल्यानंतर त्याला कलर्स मराठी वरील बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनला बोलवण्यात आलं. त्यामुळे जय दुधाने हे नाव आता महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले पाहायला मिळत आहे. एक स्ट्रॉंग कंटेस्टंट म्हणून तो या शोमध्ये स्वतःची ओळख निर्माण करताना दिसत आहे, मात्र वारंवार होत असलेल्या वादांमुळे जय प्रेक्षकांच्या टीकेला देखील सामोरे जाताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात तो किती काळ तग धरून राहतो हे येत्या काही काळातच स्पष्ट होईल.
