लगान हा बॉलिवूड चित्रपट २००१ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात केसरिया हे पात्र साकारले होते अभिनेत्री ‘परविना बानो’ हिने. चित्रपटात आमिर खानचा भाऊ गोली याच्या पत्नीची भूमिका तिने निभावली होती. परविना बानोचा अभिनित केलेला हा पहिलाच चित्रपट ठरला होता त्यानंतर तिने काही चित्रपटातून मिळेल त्या भूमिका साकारल्या होत्या. सध्या परविनाची परिस्थिती खूपच दयनीय झाली आहे. आर्थिक तंगीमुळे आणि आजारपणामुळे तिला या संकटाला सामोरे जावे लागत आहे. परविना बानो आपल्या पतीपासून विभक्त झाली होती तिला एक मुलगी देखील आहे.
मुलीला घेऊन ती तिच्या बहिणीकडे राहत होती. परंतु २०११ साली ब्रेन स्ट्रोकचा तिला अटॅक आला आणि सगळं होत्याचे नव्हते झाले. ब्रेन स्टोक, अर्धांगवायूचा झटका आणि ब्लड प्रेशरच्या त्रासाला ती गेल्या दहा वर्षांपासून झुंज देत आहे. या आजारपणामुळे परविनाने आपल्या जवळचे सर्व पैसे उपचारासाठी खर्च केले. तिच्या या आजारपणामुळे तिला कामही मिळेनासे झाले. मधल्या काळात तिच्या भावाने तिला आर्थिक मदत केली मात्र तोही आता कॅन्सरच्या आजाराला तोंड देत आहे. तिची धाकटी बहीण चित्रपटातून असिस्टंट डायरेक्टरचे काम करत होती मात्र सद्यपरिस्थितीमुळे, चित्रपट बंद असल्याने तिला आता कामही मिळेनासे झाले. त्यामुळे होणारा खर्च कसा भागवावा हा मोठा प्रश्न तिच्यासमोर उभा आहे. परविनाला आजारपणाच्या उपचारासाठी आठवड्याला १८०० रुपये लागतात.
Cinta कडून तिला किराणा मिळाला आहे. याशिवाय सोनू सूदकडे देखील तिने मदत मागितली आहे. सोनू सुदला जेव्हा ही बातमी समजली तेव्हा त्याच्या टीमने घरी येऊन महिनाभराचा किराणा दिला आणि सोबतच माझ्या आजारावरील औषधं देखील आणून दिली आहेत असे परविना बानो म्हणतात. परविना बानो ४२ वर्षांच्या असल्या तरी काम करण्याची जिद्द अजूनही त्यांच्यात आहे. या आजारावर उपचार होऊ शकतो मात्र तेवढे पुरेसे पैसे आज माझ्याकडे नाहीयेत ही खंत त्यांनी मीडियासमोर व्यक्त केली आहे. चित्रपटात दुय्यम भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना नेहमीच आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते त्यासाठी शासनाने अशा कलाकारांसाठी पुरेशी तरतूद करून ठेवणे अनिवार्य आहे.