Breaking News
Home / जरा हटके / ओ शेsssठ हे लोकप्रिय गाणं गेलं चोरीला.. पहा नेमकं काय आहे हे प्रकरण
sandhya keshe and praniket

ओ शेsssठ हे लोकप्रिय गाणं गेलं चोरीला.. पहा नेमकं काय आहे हे प्रकरण

गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘ओ शेsssठ, तुम्ही नादच केलाय थेट..’ हे गाणं धुमाकूळ घालत होतं. अगदी फोनची रिंगटोन असो वा कॉलरट्यून ह्या गाण्याची जादू सर्वदूर पाहायला मिळाली होती. तर अनेकांच्या सोशल मिडीया स्टेटसवर देखील हे गाणं पाहायला मिळायचं. सोशल मीडियावर हे गाणं व्हायरल झाल्यावर या गाण्याचा गायक कोण असा प्रश्न अनेकांना पडला होता. हे गाणं गायलं आहे “उमेश गवळी” याने. उमेश गवळी यांनी या गाण्याअगोदर अनेक गाणी गायली आहेत मात्र आता ओ शेsssठ या गाण्याचे संगीतकार आणि गीतकार संध्या केशे आणि प्राणिकेत यांनी हे गाणं चोरीला गेलं असल्याचा आरोप उमेश गवळी यांच्यावर लावला आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात.

sandhya keshe and praniket
sandhya keshe and praniket

संध्या केशे यांचे असे म्हणणे आहे की, ‘ हे गाणं तुम्ही सर्वांनी डोक्यावर घेतलं, माझी ४ वर्षांची मेहनत तुमच्यामुळे फळाला आली जे यश मला मिळालं ते केवळ तुमच्याचमुळे आहे, मी हे गाणं उमेशला गायला दिलं मात्र आता तो आमच्या विरोधात खोट्या तक्रारी करतो आहे आणि तो आता म्हणतो आहे की हे गाणं माझं आहे, मीच या गाण्याचा गायक, गीतकार आहे.’ ह्या गाण्याबाबत संध्या केशे यांनी आणखी खुलासा करत सांगितलं की हे गाणं माझ्याच नावावर रजिस्टर आहे केवळ आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे म्हणून नाही तर आपल्या लोकांसोबत काम करता यावे म्हणून मी हे गाणं उमेश गवळीला गायला दिलं होतं. या गाण्याच मानधन उमेश गवळीला दिलं नसलं तरी आणखी तीन गाणी आम्ही त्याला दिली होती असा दावा संध्या केशे यांनी फेसबुक लाईव्ह येऊन सांगितलं आहे. शिवाय या गाण्यामुळे उमेशचा खूप फायदा देखील झाला आहे. ही माझी प्रॉपर्टी आहे आणि आता तो हे गाणं त्याचं असल्याचा दावा तो करत आहे.

umesh gawali and sandhya keshe
umesh gawali and sandhya keshe

काही दिवसांपूर्वी उमेश हे सांगत होता की संध्या आणि प्राणिकेत यांच्या म्युजिकला तोड नाहीये आणि आता त्याचे असे वक्तव्य आम्हाला मनस्ताप करणारे ठरत आहे. वृत्त माध्यमातून हे गाणं गाणाऱ्याची दखल घेतली गेली, एवढेच नाही तर या गाण्याचा वापर राजकीय नेते मंडळींना ट्रोल करण्यासाठी देखील व्हायचा. हे गाणं तो स्वतःच्या नावाने खपवायला बघतोय, माझ्या आयुष्यात आलेला हा छोटासा आनंद देखील तो आता हिरावून घेत आहे… एक सक्सेस आपल्याला डिप्रेशनमध्ये घेऊन जात असल्याचे सांगत संध्या खूपच भावुक होताना दिसली. आपली खंत व्यक्त करताना तिला अश्रूही अनावर झाले होते. या गाण्याचे निर्माता, संगीतकार प्राणिकेतच पाठिंबा देखील संध्याला मिळाला आहे. दरम्यान या प्रकरणी उमेश गवळीने हे गाणं माझं असल्याचा दावा केला आहे आणि संध्या केशे विरोधात त्याने पुणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुणे पोलिसांनी या गाण्याचे मूळ मालक कोण आहेत याची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.