या रविवारपासून बिग बॉसचा तिसरा सिजन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचा प्रोमो सादरीकरण चित्रित झाले असून त्यात सहभागी होत असलेल्या स्पर्धकांची ओझरती तोंड ओळख प्रेक्षकांना पाहायला मिळाली. त्यामुळे या शोमध्ये असणारे आवडते कलाकार पाहण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये तयार झाली आहे. अर्थात या मालिकेत कधीही स्पर्धकांची नावे उघड केलेली नाहीत, ती नावे अखेरपर्यंत गुलदस्त्यात ठेवल्यानेच पुढे घडणाऱ्या अनपेक्षित गोष्टींची उत्सुकता टिकून राहिली आहे. यातून बऱ्याचशा कलाकारांची नावे स्पर्धक म्हणून असू शकतील अशा संभावना व्यक्त करण्यात आल्या होत्या, मात्र याच गोंधळामुळे आता एका प्रसिद्ध कलाकाराला मालिकामध्ये काम मिळणे कठीण झाले आहे.
हा प्रसिद्ध अभिनेता आहे संग्राम समेळ, गेल्या काही दिवसांपासून संग्राम समेळ हा बिग बॉसचा स्पर्धक असल्याची संभावना प्रसार माध्यमांद्वारे व्यक्त केली जात होती. त्यामुळे मित्र मंडळींनी, सहकलाकारांनी आणि चाहत्यांनी फोनवरून आणि मेसेज द्वारे शुभेच्छा दिल्या होत्या. संग्राम मुख्य भूमिकेत असलेली मालिका शुभमंगल ऑनलाइन नुकतीच समाप्त झाली आहे. यावरून मालिकेतील अभिनेते संग्राम समेळ आणि सुयश टिळक हे दोघेही बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार असे तर्क लावण्यात आले होते. त्यावर सुयश टिळकने मी या घरात जाणार नसल्याचे एका पोस्ट द्वारे स्पष्ट केलेले होते. सुयश प्रमाणे संग्रामला देखील आता अशाच परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. मालिकांमधून काम करत असल्याने त्याला फॉलो करणारा चाहता वर्ग मोठा आहे. ह्या सर्व बातम्यांमुळे येणाऱ्या फोन आणि मेसेजेसला संग्राम जिकिरीने तोंड देत आहे. प्रसार माध्यमांनी खोट्या बातम्या दिल्या आहेत आणि त्यामुळे आता संग्रामला कोणीही नवीन कामही देत नसल्याची खंत त्याने मीडिया समोर मांडली आहे.
अभिनेता संग्राम समेळ याबाबत म्हणतो की जेव्हापासून माझे नाव बिग बॉसच्या संभाव्य यादी मध्ये घेतले जात आहे, तेव्हापासून मला अनेकांचे फोन येऊ लागले. मी त्या घरात जाणार असल्याचे समजताच त्यांनी माझे अभिनंदन केले आहे मात्र या सर्व गोष्टी खोट्या आहेत आणि या अफवांमुळे आज मला कोणताही प्रोजेक्ट मिळत नाहीये. संग्राम समेळ प्रमाणे अजूनही बऱ्याच कलाकारांची नावे स्पर्धक बनून जाणार असल्याचे चर्चा होती मात्र या बातम्यांमध्ये किती तथ्य आहे याचा उलगडा शो झाल्यावरच होणार आहे. काही चुकीच्या नावांमुळे अप्रत्यक्षरीत्या कोणाचेही नुकसान होऊ नये अशी भावना प्रसार माध्यमांची असली तरीही त्याचा कलाकारांना तोटा होत असल्याचे या उदाहरणावरून पाहायला मिळत आहे. भविष्यात अफवांमुळे अशी वेळ कोणत्याही कलाकारावर येऊ नये असे वाटते, प्रेक्षकांनी संग्रामला कायम पाठिंबा द्यावा.