मराठी सीरिअल राजा राणीची जोडी या मालिकेत संजीवनीची खास मैत्रीण मोनाची भूमिका साकारली होती अभिनेत्री श्वेता खरात हिने. परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी हे पात्र दुसऱ्या अभिनेत्रीकडे सुपूर्त करण्यात आले आहे. मोनाची भूमिका आपल्या सहजसुंदर अभिनयाने गाजवणारी श्वेता खरात ही झी मराठीवरील मन झालं बाजींद या मालिकेत प्रमुख नायिकेची भूमिका साकारताना दिसत आहे. एक सहनायिका ते मुख्य नायिका बनण्याचा तिचा हा प्रवास कमालीचाच म्हणावा लागेल. श्वेता खरात आता नायिका बनून प्रेक्षकांसमोर आल्याने राजा राणीची जोडी ही मालिका तिने सोडली आहे, त्यामुळे तिच्या जागी आता अभिनेत्री ऐश्वर्या शिंदे हिची वर्णी लागली आहे.
ऐश्वर्या शिंदे ही नाट्य आणि चित्रपट अभिनेत्री असून नागराज मंजुळे यांच्या गाजलेल्या चित्रपटात ऐश्वर्याला काम मिळाले होते. या चित्रपटात तिच्या वाट्याला फारसे डायलॉग आले नसले तरी उत्तम अभिनयामुळे तिला नावाजले होते. बबन, पाणी अशा चित्रपटातून ऐश्वर्या प्रेक्षकांच्या भेटीला आली. ललित कला अकादमी मधून अभिनयाचे धडे गिरवलेल्या ऐश्वर्या शिंदे हिने विद्यार्थी लेखिका आणि दिग्दर्शिका बनून ओळख हे नाटक साकारलं. तार, तहकूब यासारख्या नाटकातून तिने अभिनय देखील साकारला. राजा राणीची जोडी ही तिची पहिली वहिली टीव्ही मालिका. या मालिकेत ती मोनाची भूमिका करताना दिसणार आहे. ही भूमिका अगोदर श्वेता खरातने साकारली होती त्यामुळे निश्चितच दोघींच्या अभिनयाची तुलना केली जाणार याचे दडपण ऐश्वर्याला आहे. मात्र त्यातूनही ती प्रेक्षकांची मने नक्कीच जिंकून घेईल यात शंका नाही. मोनाच्या भूमिकेसाठी आणि पहिल्या वहिल्या मालिकेसाठी ऐश्वर्या शिंदे हिला शुभेच्छा आणि अभिनंदन…