मेरी एक टांग निकली है, मैं हॉकी का बहुत बड़ा खिलाड़ी था. एक दिन उदय भाई को मेरी किसी बात पर गुस्सा आया उन्हें मेरी हॉकी स्टिक से मेरे टांगो के ४ टुकड़े कर दिए. लेकिन दिल के वह बड़े अच्छे हैं. हा डायलॉग कोणत्या चित्रपटातला आहे असं म्हटलं तर लगेचच तुम्हाला नाना पाटेकर, अक्षय कुमारचा वेलकम चित्रपट आठवेल. या चित्रपटात उदय शेट्टीच्या हाताखाली काम करणारा एक अपंग व्यक्ती हा डायलॉग म्हणत असतो. या डायलॉगमुळे ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांना एक वेगळी ओळख मिळाली आहे. नाटकातून काम करत असलेल्या मुश्ताक खान यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास आजतागायत सुरू आहे.
पण एवढी वर्षे काम करूनही आपल्याला योग्य तो मोबदला किंवा अभिनयाची जबाबदारी दिली जात नाही. अशी खंत त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीत व्यक्त केली आहे. मुश्ताक खान यांचा हा प्रवास नेमका कसा आहे हे जाणून घेऊयात. नाटकातून काम करत असताना मुश्ताक खान मुंबईत आले. इथे आल्यावर प्रत्येक कलाकाराला काम मिळवण्यासाठी जसा स्ट्रगल करावा लागतो तसा स्ट्रगल त्यांनीही केला. हाताला काम नसल्याने जुहूमध्ये भाड्याच्या खोलीत राहत असलेल्या मुश्ताक खान यांचे पाच महिने घराचे भाडे थकले होते. १९७९ च्या वेळी त्या खोलीचे भाडे १२५ रुपये होते. पण कामच नसल्याने ते हतबल झाले होते. त्यावेळी टिनू आनंद कालिया नावाचा चित्रपट बनवत होते. एका मित्राच्या मदतीने ते टिनू आनंदला भेटले.
मी थिएटर आर्टिस्ट आहे आणि मला काम हवंय म्हटल्यानंतर टिनू आनंद यांनी काम नसल्याचे सांगितले. पाच महिन्यांचे घराचे भाडे थकलंय असे म्हटल्यावर टिनू आनंद यांनी मुश्ताक यांना एक भूमिका देऊ केली. या चित्रपटात ९ दिवसांसाठी त्यांना काम मिळाले. दिवसाला १०० रुपये मिळत असल्याने मुश्ताक यांचा राहण्याचा तात्पुरता प्रश्न मिटला होता. या चित्रपटामुळे त्यांची अमिताभ बच्चन यांच्याशी ओळख झाली. तेव्हा अमिताभ बच्चन यांनी कमी खर्चात राहण्याची सोय करून दिली. बॉलिवूड चित्रपटात मुश्ताक खान यांना छोट्या छोट्या भूमिका मिळत गेल्या. पण यामुळेच त्यांचा चेहरा ओळखीचा बनत गेला. राजा, अंगारे, आशिकी, दिल है की मानता नहीं, चाहत, बंबई का बाबू अशा चित्रपटातून त्यांना अभिनयाची संधी मिळत गेली. फक्त खंत एकच होती की आपल्याला कुठल्याही दिग्दर्शकाने विरोधी भूमिकेसाठी नाकारले.
सकारात्मक भूमिकेपेक्षा मला नकारात्मक भूमिका मिळायला हव्या होत्या. त्या मी उत्तम निभावल्या असत्या अशी एक खंत त्यांनी या मुलाखतीत बोलून दाखवली. इंडस्ट्रीबद्दल त्यांचे मत अगदी स्पष्ट आहे, की जो नमतं घेतो तोच टिकून राहतो. एकेकाळी प्रसिद्धीच्या शिखरावर असलेला राजेश खन्ना शेवटच्या दिवसात मात्र एकाकी होता. हेच या ग्लॅमरस दुनियेचे सत्य आहे आणि हे मी स्वीकारलं आहे असे मुश्ताक बिनधोकपणे सांगतात. वेलकम चित्रपटात मुश्ताक यांची भूमिका खूप गाजली होती. या भूमिकेसाठी त्यांना खूप कमी मानधन मिळाले होते. अगदी अक्षय कुमारचा जो स्टाफ होता त्यापेक्षाही मला कमी मानधन दिले गेले. दुबईत अक्षय कुमारचा स्टाफ ज्या हॉटेलमध्ये होता त्या हॉटेलमध्ये मला रूम देण्यात आली होती असे ते सांगतात. पण असे असले तरी मला त्याचे काही वाटले नाही. जे जसं मिळालं तसं मी स्वीकारत गेलो याबद्दल मला कोणाबद्दलही आकस नाही. मी तर म्हणतो की सगळ्या कलाकारांसोबत माझे छान सूर जुळलेले आहेत. काम छोटे असो किंवा मोठे अभिनेता म्हणून मी करत आलो आहे.