रंगभूमीवरील नवख्या कलाकारांना वेगवेगळ्या नाट्यस्पर्धांमधून अभिनयाला वाव मिळत असतो. त्यामुळे या नाट्यस्पर्धा गाजवून मराठी चित्रपट तसेच मालिका सृष्टीत त्यांना अभिनयाची संधी मिळते. पुरुषोत्तम करंडक या स्पर्धेचे तेवढेच महत्व मानले जाते. ५७ वर्षांचा इतिहास असलेल्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत यंदाच्या वर्षी परिक्षकांनी निराशाजनक निर्णय घेतल्याचे निदर्शनास आले आहे. या निर्णयावर अनेक कलाकारांनी आक्षेप घेतलेला पहायला मिळतो आहे. एकही एकांकिका या बक्षिसास पात्र ठरली नाही. यंदाच्या वर्षी हा करंडक कोणत्याच संघाला न दिल्याने कलाकार मंडळीच नव्हे तर मराठी सृष्टीतील नामवंत सेलिब्रिटीनी देखील आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.

विजू माने यांनी परीक्षकांच्या या भूमिकेबाबत तर जाहीरपणे आक्षेप घेत या स्पर्धेबाबत आपले मत व्यक्त केले आहे. त्यांच्या या मतावर अनेक कलाकारांनी उड्या घेत या निर्णयाचा जाहीरपणे निषेधच केला आहे. निषेध, मी ही स्पर्धा पाहिलेली नाही त्यामुळे एकांकिकांच्या दर्जाबद्दल मी बोलू शकत नाही. परंतु या वृत्तीचा मला कायम राग येतो. एखाद्या धावण्याच्या स्पर्धेत धावणारे पाच जण असतील तर, त्यात सगळ्यात पुढे असेल तो पहिला येणं हे सामान्य स्पर्धेतील लॉजिक इथे का लावलं जात नाही? मुळात अमुक एक दर्जा असलेल्या एकांकिका हव्या आहेत, असं जर परीक्षकांना वाटत असेल तर त्यांनी प्राथमिक फेरीतच दर्जेदार एकांकिका नाहीत म्हणून स्पर्धा होणार नाही असं जाहीर करून टाकावं.

म्हणजे दिवस रात्र प्रयत्न करणाऱ्यांचा विनाकारण हिरमोड होणार नाही. एकांकिका करणाऱ्या मुलांना उगाच ‘नाडण्याची करणी’ करणारे असे परीक्षक मी एकांकिका करत असतानाही होते. तेव्हा सुद्धा माझं हेच मत होतं. ज्या लोकांमध्ये स्पर्धा आहे त्या लोकांमधला जो उत्तम आहे त्याला पहिला क्रमांक द्या. तुम्ही तरी तुमच्या शाळेत १०० पैकी १०० मार्क कधी मिळवले होते का? पण म्हणून एखाद्या वर्गात ६५ मार्क मिळवणारा मुलगा सर्वोच्च मार्क मिळवणारा असेल. तर त्याला पहिला क्रमांक द्यायचा नाही ह्याला काय अर्थ आहे. मला तेव्हाही असं वाटायचं की आधी परीक्षकांची नावं जाहीर करा. मग आम्ही तशी एकांकिका सादर करू. आजही दिवस काही फार बदललेले नाहीत.
ह्या गोष्टीवर कोणीतरी बोललं पाहिजे आणि हा मुद्दा विजू माने यांनी उचलून धरल्याने त्यांचे कलाकारांनी स्वागतच केले आहे. खरं तर प्रत्येक कलाकार या स्पर्धेसाठी मेहनत घेत असतो. करंडक मिळवण्यास अपात्र ठरलेल्या स्पर्धकांमधील कोणी कलाकार पुढे जाऊन मोठा कलाकार होऊ शकतो. मग जी एकांकिका सरस ठरली असेल तिला हा पुरस्कार देण्यात गैर काहीच नाही. अगदी ५० टक्के गुण मिळणारा विद्यार्थी देखील पुढे जाऊन १०० टक्के गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्याला टक्कर देऊ शकतो. पण मग त्याच्यात काहीच चांगले गुण असू शकत नाहीत का असा प्रश्न करंडक न देण्याबाबत उपस्थित केला जात आहे. या निर्णयावर कलाकारांनी आक्षेप घेत जाहीरपणे आपला निषेध नोंदवला आहे.