संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या जीवनावर आधारित सोनी मराठी वाहिनीवर ज्ञानेश्वर माऊली ही मालीका प्रसारित केली जात आहे. आई वडील असताना आपल्या चार मुलांना हा समाज इतका त्रास देतोय तर आईवडिलांच्या पश्चात तोच समाज किती त्रास देईल याची कल्पना मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. एक बाप आपल्या लेकरांसाठी किती कासावीस होतोय हे विठ्ठल पंतांच्या भूमिकेने दाखवून दिलं आहे. आपल्या मुलांना सुख समृद्ध प्राप्त व्हावं त्यांच्या शिक्षणाचा अधिकार त्यांना मिळावा यासाठी विठ्ठल पंत देहांत प्रायश्चित्त स्वीकारत आहेत.
हा प्रसंग ज्ञानेश्वर माऊली या मालिकेतून नुकताच दाखवला जात आहे. अभिनेते विक्रम गायकवाड यांनी विठ्ठलपंतांची भूमिका आपल्या सहजसुंदर अभिनयाने इतकी सजग केलेली आहे की साक्षात हा प्रसंग घडला त्यावेळी त्यांची झालेली मनःस्थिती प्रत्यक्षात अनुभवायला मिळत आहे. मालिकेत रुक्मिणी आईच्या भूमिकेत अभिनेत्री स्मिता शेवाळे दिसत आहे. तर प्रत्यक्षात ज्ञानेश्वर माऊलींची भूमिका अभिनेता वरुण भागवत यांनी साकारली आहे. माऊलींचा जीवनप्रवास किती खडतर होता हे या मालिकेतून प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर अनुभवता येत आहे. आजवर माऊलींवर अनेक चित्रपट साकारले गेले त्यातून त्यांची महती अनुभवता आली परंतु हीच महती छोट्या पडद्यावर साकारण्याची जबाबदारी दिग्पाल लांजेकर यांनी पेलली आणि ती तितक्याच सुरेख रीतीने प्रेक्षकांसमोर आणली यासाठी त्यांचे प्रेक्षकांनी मनापासून कौतुक केले आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या ७२५ व्या संजीवन समाधी वर्ष पूर्तीचे औचित्य साधून सोनी मराठी वाहिनीवर दिव्यत्वाचे दर्शन देणारी “ज्ञानेश्वर माऊली” ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर यांची निर्मिती असलेल्या या मालिकेचे दिग्दर्शन रघुनंदन बर्वे करत आहेत. तर संवाद लेखन नितीन वाघ आणि अनघा काकडे यांनी केले असून पार्श्वसंगीताची धुरा केदार दिवेकर निभावत आहे. ग्राफिक्स, स्पशेल इफेक्ट आणि अत्याधुणीक तंत्रज्ञानाचा वापर करीत भूतकाळातील अनेक अपरिचित घडामोडी सहज सोप्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. वारकरी, माळकरी तसेच भक्ती संप्रदायातील प्रेक्षक वर्गाला माऊलींच्या या दिव्यत्वाची अनुभूती नक्कीच अनुभवता येईल ही शाश्वती दिगपाल लांजेकर यांच्याकडून मिळत आहे. मालिकेतील उत्तम कलाकारांमुळे मालिकेची उत्कंठा दिवसेंदिवस वाढत आहे. आई वडिलांच्या पश्चात आता ही चार भावंडे आपले जीवन कसे व्यतीत करतात हे येत्या काही भागातून पाहायला मिळणार आहे. भूतकाळातील अद्भुत गोष्टींचे दर्शन घडविणाऱ्या सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.