सोनी मराठी वाहिनीवर ज्ञानेश्वर माऊली ही अध्यात्मिक मालिका प्रसारित केली जात आहे. नुकताच या मालिकेचा वारी विशेष भाग दाखवण्यात आला होता. मालिकेत ज्ञानेश्वर माऊलींची भूमिका वरुण भागवतने साकारली आहे. वरुणची एक पोस्ट सध्या नेटकऱ्यांचे लक्ष्य वेधून घेताना दिसत आहे. या आगळ्या वेगळ्या पोस्टमध्ये वरुणने पांडुरंग आणि गुगल मॅप मधील एक साधर्म्य दाखवून दिले आहे. या पोस्टमध्ये वरूण म्हणतो की, कधी पाहिलंय का की पांडुरंगाचा टिळा आणि गुगल मॅपच्या ऍपचा सिम्बॉल हा जवळजवळ सारखा आहे. मी निरीक्षण करत बसलो आणि लक्षात आलं की बरोबर. दोघेही फायनल डेस्टिनेशन सांगतात.
गुगल मॅप आपल्याला इप्सित स्थळी पोहोचवतो आणि पांडुरंगाचा तो टिळा, नाम हे दर्शवतो की इथे पोहोचायचय. गुगल मॅप रस्ता दाखवतो, पांडुरंग मात्र म्हणतो की रस्ता तुम्ही शोधा. तिथपर्यंत पोहोचण्याचं गमक तो सांगतो. प्रत्येकाचे रस्ते भिन्न असतील. प्रत्येकाच्या रस्त्यात मधे मधे सतत स्टॉप लागतील. त्या स्टॉपचं नाव असेल कर्म. एका कर्माची रेषा हिरवी तर दुसऱ्याची लाल असेल. हिरवा रंग म्हणजे चांगलं कर्म. लाल म्हणजे कुकर्म. हिरवं कर्म निवडायचं यासाठीची बुध्दी पांडुरंग आपल्याला देतो, ती वापरायचं काम आपलं. नाहीतर लाल रंगाच्या कर्माच्या ट्राफिक जॅम मधे आपण फसतो आणि काही केल्या त्यातून बाहेर पडता येत नाही. चॉईस आपल्या हातात दिलाय, योग्य निवड करत जात राहायचं.
रस्ता कधी कच्चा असतो, कधी पक्का, कधी चढ तर कधी उतार. कधी खड्डे तर कधी एकदम सुबक रस्ता, कधी सरळ तर कधी वळणावळणाचा रस्ता. कधी पहिला गिअर तर कधी मस्त पाचव्या गिअरवर जाता येईल. कधी आपण रस्त्याचा हात पकडू, कधी तो आपला हात पकडेल, अर्थात कधी आयुष्य आपल्याला नेत राहील, कधी आपण आयुष्याला सांगू, चल आज या दिशेने जाऊ. ज्याप्रमाणे रस्त्यात कधी गाडी बदलावी लागते त्याप्रमाणे आयुष्यात वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात. कधी पायी चालावं लागतं त्याप्रमाणे जीवनात खडतर मार्ग अवलंबावा लागतो. या जगात आपण सारेच मुसाफिर, भटकत असतो. रस्ता असतो, चालत राहतो. हवेसंग डोलत प्रवासाचा आनंद घेत असतो.
आनंद घेत नाही आहोत असं जाणवत असेल तर क्षणभर थांबून एकदा विचार करायचा आणि स्वतःला विचारायचं की प्रवासात मजा येते आहे ना? कारण नीट विचार केला की कळतं की, इथे डेस्टिनेशन महत्त्वाचं आहे पण प्रवास जास्त महत्त्वाचा आहे. प्रवास उत्तम करायचा आहे. ऊन, सावली, पाऊस, वारा सगळं लागणार आहेच. पण आयुष्याची वारी अथक पूर्ण करायची. तिही शक्य तिथे, शक्य तेव्हा, शक्य तेवढा, शक्य तेवढ्या साऱ्यांना आनंद देत. कारण माउलींनी म्हटलंच आहे, अवघाचि संसार सुखाचा करीन,आनंदें भरीन तिन्ही लोक. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. डेस्टिनेशन तर सेट आहे. प्रवास उत्तम आणि आनंदी करणं आपल्याच हाती.