बॉलिवूड सृष्टीत आज रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची लगीनघाई सुरू झाली आहे. प्रसार माध्यमातून या लग्नाला कोणी कोणी हजेरी लावली हे दाखवण्यासाठी पुरती चढाओढ रंगली आहे. एकीकडे ही लगीनघाई सुरू असतानाच मराठी सृष्टीतील एक चर्चेत असलेलं कपल लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे समोर आले आहेत. हे चर्चेत असलेलं कपल म्हणजेच विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे होय. वर्षाच्या सुरुवातीलाच विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांचा साखरपुडा पार पडला होता. अतिशय गुप्तता बाळगून असलेल्या या साखरपुड्याची बातमी त्यांनी काही दिवसानंतर जाहीर केली होती.

त्यानंतर विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे एका जाहिरातीत झळकले. जाहिरातीत हे दोघेही नवरदेव नवरीच्या पोशाखात नटलेले पाहायला मिळाले. ह्याच जाहिरातीच्या व्हिडिओवरून त्यांचे लग्न तर झाले नाही ना असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मात्र ती केवळ एक जाहिरात होती असे स्पष्टीकरण विराजसने दिले होते. आता त्यांच्या लग्नाची तारीख त्यांनी जाहीर केली आहे. येत्या ७ मे २०२२ रोजी हे दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे आता त्यांच्या लग्नाच्या खरेदीची लगबग सुरू झालेली आहे. लग्नाच्या अगोदर मेहंदी, संगीत सोहळा आणि हळदीचा सोहळा मोठ्या थाटात पार पडणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे.

शिवानी आणि विराजस हे दोघेही एकमेकांना खूप आधीपासून ओळखतात. दोघांची ही मैत्री आता लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याने त्यांच्या चाहत्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी ठरली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर या मालिकेत तिने रमाबाईंची व्यक्तिरेखा साकारली होती. तिच्या सहजसुंदर अभिनयाचे तिने हे ऐतिहासिक पात्र सुरेख निभावले होते. याशिवाय आप्पा आणि बाप्पा, आम्ही दोघी, यलो, चिंटू २ या चित्रपटातूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. शिवानीने काही वृत्तपत्रासाठी लेख लिहिले आहेत, हे लेख वृत्त पत्रातून छापून देखील आले आहेत.
तर विराजस कुलकर्णीने झी मराठीवरील माझा होशील ना मालिकेतील मुख्य भूमिका साकारली होती. विराजस कुलकर्णी व्हिक्टोरिया या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तो पहिल्यांदाच चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रात उतरत आहे. याअगोदर थेटरऑन या त्याच्या संस्थेतून त्याने नाटकांचे लेखन, दिग्दर्शन आणि आई मृणालदेव कुलकर्णी यांच्यासोबत चित्रपटाचे सहदिग्दर्शक म्हणून काम केले होते. डावीकडून चौथी बिल्डिंग या नाटकात विराजस आणि शिवानी दोघेही एकत्रित झळकले आहेत.