मराठी सिनेमा, नाटक, मालिका या माध्यमातील विनोदी कलाकारांच्या परंपरेच्या मुळाशी गेल्यानंतर आपल्याला एक गोष्ट नक्की कळेल आणि ती म्हणजे पडदयावर खळखळून हसवणारे हे विनोदवीर बरेचदा डोळयात टचकन पाणी आणणारी, अंतर्मुख करायला लावणारी गोष्ट सांगून जातात. हसता हसता रडवणाऱ्या अशा अस्सल कलाकारांच्या पंक्तीतला अभिनेता कुशल बद्रिकेही त्याच्या सोशल मीडियावर कानपिचक्या घेत असतो. कुशलने आता काय नवी पोस्ट करून वास्तवाचे चिमटे घेतले हे बघायला, वाचायला त्याचे चाहते नेहमीच आतुर असतात. नुकताच कुशलने त्याच्या इन्स्टावर ब्लॅक अँड व्हाइट फोटो टाकत भन्नाट कॅप्शन दिली आहे.
त्यासोबत लिहिलेल्या ओळींमध्ये तो असं म्हणतोय की, आपल्या कलर फोटोतील रंग फिके झाले असतील तर तो फोटो ब्लॅक अँड व्हाइट मोडमध्ये करून पोस्ट करावा. त्यामुळे फोटोही छान दिसतो आणि पुसट झाले रंगही झाकले जातात. हा विचार फक्त सोशलमीडियावरील फोटोपुरताच करू नये तर आयुष्यातील काही क्षणांच्या बाबतीतही करावा. कारण एक वेळ आयुष्यात येणाऱ्या क्षणांना मुलामा असलेले रंग नसले तरी चालतील. ते ब्लॅक अँड व्हाइट असले तरी चालतील. पण बरबाद करणारे खोटे रंग आयुष्यातील कोणत्याच क्षणांना असू नयेत. कुशलच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी कमेंट करून त्याच्या विनोदापलीकडील विचाराला दाद दिली आहे.
तसेच तुझे फोटो कधी फिके पडणार नाहीत, तू नेहमीच उत्साही आणि आकर्षक राहशील अशीही कमेंट कुशलला आली आहे. चला हवा येऊ दया या शोमधून कुशल बद्रिके हा अवलिया प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोच्या मंचावर कुशलने आजपर्यंत अनेक भूमिका केल्या. त्याच्या स्त्रीपात्राला तर धमाल प्रतिसाद मिळतो. विनोदाचं अचूक टायमिंग आणि सहजसुंदर अभिनय यामुळे कुशलने विनोदी अभिनेत्यांच्या पंक्तीत खास जागा मिळवली आहे. विनोदी अभिनयाबरोबरच कुशल गंभीर भूमिका करण्यातही बाप आहे. प्रसिध्द अभिनेते दादा कोंडके यांच्या स्मृती जागवण्यासाठी विजू माने विशेष प्रयत्न केले.
विजू माने यांनी दिग्दर्शित केलेला पांडू या सिनेमात कुशलने म्हादू हवालदारची भूमिका लीलया साकारली. कुशल हा सोशल मीडियावर नेहमीच एक्टीव्ह राहिला आहे. मध्यंतरी त्याने पत्नीसोबत आयुष्यातील संघर्षावर केलेली पोस्टही खूप चर्चेत आली होती. तर विजू माने यांच्यासोबत एका भिंतीवर लिहिलेल्या टू व्हिलर या चुकीच्या इंग्रजी शब्दावरून आजच्या शिक्षणाचा समाचार घेणारा व्हिडिओ शेअर केला होता. विनोदाच्या माध्यमातून सतत हसविणारा कुशल आनंदी जीवन जगण्याच्या समर्पक शैलीची कास धरून आहे.