मालिकेच्या नायकाने कसं नेहमी गुणी मुलगा असलं पाहिजे हा ट्रेंड गेल्या काही मालिकांमधून हद्दपार होत आहे. मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवावे यासाठी ज्या काही क्लुप्त्या असतात त्यापैकीच एक म्हणजे नायकालाच खलनायकाच्या पात्रात दाखवायचे. हा सध्या ट्रेंड दिसतोय तो तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत. मालिकेच्या सुरूवातीला अगदी गुड बॉय असलेला नायक सिध्दार्थ म्हणजेच सिद हा सध्या वाईट वागून मालिकेत ट्विस्ट आणत आहे. तात्या आणि बयोआजींच्या लग्नाच्या वाढदिवसात सिद्धार्थने धिंगाणा घातला आहे. सिद्धार्थचे हे रूप देशमुख कुटुंबालाच नव्हे तर प्रेक्षकांनाही धक्का देणारं आहे. अनेक अडचणी आणि अडथळे पार करत या मालिकेतील सिद्धार्थ आणि आदितीचं लग्न झालं.
पण सिध्दार्थला नेहमीच गुळपोळी गाव सोडून अमेरिकेत व्यवसाय उभा करायचा आहे. या दोघांच्या लग्नापर्यंत सगळं व्यवस्थित सुरू असतानाच सिध्दार्थच्या मनातून अमेरिकेला जाण्याचा विचार काही जात नाही. तर इकडे तात्यांनी आदिती आणि सिध्दार्थ ऍग्रो उत्पादनांची फॅक्टरी काढण्यासाठी जागा दिली. सिध्दार्थने त्याकडे पाठ फिरवून आदितीच्या वडीलांच्या मदतीने अमेरिकेला जाण्यासाठी घरात चोरी करण्यापासून, आदितीला खोटं ठरवण्यापासून ते घरातील सर्वांना इमोशनल ब्लॅकमेल करण्यापर्यंत अनेक उचापती केल्या. आदितीला फायनान्स करण्यासाठी आलेल्या उद्योजिका रेवा हिच्या मनातही गैरसमज पसरवून आदितीऐवजी स्वत:च्या स्टार्टअपला फायनान्स देण्यासाठी प्रवृत्त केले.
पण तिथेही त्याचा प्लॅन फसला, आता त्याने दारू पिऊन घरात धिंगाणा घालण्याचे नाटक सुरू केले आहे.मालिकेच्या या नव्या प्रोमोमुळे येणाऱ्या एपिसोडमध्ये सिध्दार्थच्या या वर्तनाबद्दल त्याला काय शिक्षा मिळणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. काही दिवसांपूर्वी आदितीला खोटं ठरवणाऱ्या सिध्दार्थचे कारस्थान त्याची आई मोठ्याबाईंच्या लक्षात आले होते. तेव्हा सिध्दार्थला घराच्या बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. पण त्यावेळी आदितीमुळेच त्याला घरात स्थान मिळाले. रेवाने सिध्दार्थलाच फायनान्स द्यावा अशी विनवणी करणारी आदिती आता साथ देईल की त्याच्यापासून लांब जाईल हे पुढच्या काही भागांमध्ये दिसेल.