लग्न करण्यासाठी प्रत्येकाला आपल्याच क्षेत्रातला जोडीदार हवा असतो. त्यांच्या या अपेक्षा पूर्ण होतात देखील. बॉलिवूड सृष्टीला या गोष्टी नवीन नाहीत मात्र आता मराठी सृष्टीत देखील अशा विचारसरणीला प्राधान्य दिले जाते. अर्थात यामुळे त्यांच्यात एकमेकांना समजून घेण्याच्या वृत्ती दिसून येते. मराठी कलासृष्टीत असे बरेचसे जोडपे आहेत जे एकाच क्षेत्रात राहून आपला संसारही सांभाळत आहेत. या यादीत आता आणखी एका कलाकाराची जोडी सामायिक झाली आहे. ती म्हणजे मालिका नाट्य अभिनेता नचिकेत देवस्थळी आणि तन्वी कुलकर्णी यांची. काल मंगळवारी २९ नोव्हेंबर २०२२ रोजी अभिनेता नचिकेत देवस्थळी आणि अभिनेत्री तन्वी कुलकर्णी यांचा लग्न सोहळा पार पडला.
लग्नसोहळ्याचे काही खास व्हिडीओ या दोघांनी इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. नचिकेत आणि तन्वीच्या लग्नातला हा थाट अतिशय साजेसा असाच होता. पिवळ्या लाल रंगाच्या पैठणीच्या साडीत तन्वीचे रूप अधिकच खुललेले पाहायला मिळाले तर नचिकतेने देखील मारून रंगाचा कुर्ता परिधान केला होता. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देत मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या समवेत त्यांनी लग्नाची गाठ बांधली. यावेळी त्यांच्या सहकलाकारांनी देखील सोहळ्याला उपस्थिती लावली होती. नचिकेत आणि तन्वीचा हा प्रेमविवाह आहे. झी मराठीवरील ती परत आलीये या मालिकेत एकत्रित काम करत असताना त्यांच्यात प्रेमाचे सूर जुळून आले होते. ही मालिका केवळ १०० भागांपूरती मर्यादित होती त्यामुळे या मालिकेला वेळेचे बंधन होते.
मालिकेतील सस्पेन्स आणि त्यातील चित्त थरारक घटना प्रेक्षकांना एका जागेवर खिळवून ठेवताना दिसल्या होत्या. मालिकेने प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेतलेला पाहायला मिळाला होता. बाबुराव, सायली, सतेज, अनुराग, विक्रांत, रोहिणी, अभय, हनम्या ही पात्र कलाकारांनी आपल्या सजग अभिनयाने साकारून प्रेक्षकांची दाद मिळवली होती. मालिका संपल्यानंतरही ही कलाकार मंडळी एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसली. अशातच नचिकेत आणि तन्वी एकमेकांना आवडू लागले. या दोघांनी जून महिन्यात साखरपुडा करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. अभिनेत्री तन्वी कुलकर्णी हिने रंगभूमीपासून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. पुरुषोत्तम करंडक सारख्या अनेक नावाजलेल्या नाट्यस्पर्धा तन्वीने गाजवल्या आहेत.
स्वराज्यरक्षक संभाजी या लोकप्रिय मालिकेत तन्वीला सगुणाबाईंची भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. जुळता जुळता जुळतंय की, स्वराज्य जननी जिजामाता अशा मालिकांमधून तन्वी झळकली आहे. अ ट्रायल बिफोर मॉन्सून या शॉर्टफिल्ममध्ये मोहन आगाशे यांच्यासोबत झळकण्याची संधी मिळाली. नचिकेत देवस्थळी हा देखील नाट्य, मालिका अभिनेता आहे. सुखन या लोकप्रिय कार्यक्रमाचा तो एक महत्वाचा भाग बनला आहे. नाटक कंपनीच्या सतीश आळेकर लिखित आणि दिग्दर्शित महानिर्वाण या नाटकातून नचिकेतने मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. ती परत आलीये ही नचिकेतने अभिनित केलेली पहिलीच टीव्ही मालिका ठरली. मिलिंद ओक दिग्दर्शित ये जो देस है मेरा या म्युजिकल शोसाठी नचिकेत काम करत आहे. तर तन्वी देखील उच्छाद नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.