झी मराठी वाहिनीवरील तू तेव्हा तशी या मालिकेतील सौरभ आणि अनामीकाची प्रेमकहाणी हळूहळू पुढे सरकत आहे. मात्र अजूनही राधा आणि कावेरी आईचा त्यांच्या प्रेमाला विरोध आहे. अनामिका आणि सौरभ जर लग्न करणार असतील तर राधा आणि हितेनच्या लग्नाला त्याच्या बाबांचा विरोध असणार हे राधाने स्पष्ट केले होते त्यामुळे ती सौरभला अनामीकापासून दूर राहण्यास सांगत होती मात्र हितेन दुसऱ्याच मुलीसोबत साखरपुडा करून मोकळा होतो. हे सत्य जेव्हा राधाला समजते तेव्हा मी हितेनवर प्रेम करून खूप मोठी चूक केल्याची ती कबुली देते. हितेनचं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं हे राधाला आता समजले आहे, त्यामुळे नीलचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

नील सुरुवातीपासूनच राधावर प्रेम करतो हे सौरभला देखील माहीत असतं. जेव्हा राधा हितेनसोबत असायची तेव्हा नील हितेनचा राग राग करायचा. हितेन चांगला मुलगा नाही हे नील चांगलाच ओळखून होता. आणि त्यामुळेच आता राधा आणि हितेनचं ब्रेकअप झाल्याने तो खूप खुश झाला आहे. आता सौरभ आणि अनामीकाच्या प्रेमकहाणी सोबत राधा आणि नीलची प्रेमकहाणी मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेत नीलचे पात्र मुख्य भूमिका इतकेच महत्वाचे ठरले आहे. माई मावशीच्या खानावळीत जेवणारा नील आता त्यांच्या घरातीलच एक सदस्य असल्यासारखा वावरू लागला आहे. त्यामुळे हे पात्र प्रेक्षकांना देखील विशेष भावलं आहे.

नीलची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराबद्दल आज काही खास गोष्टी जाणून घेऊयात. मालिकेत नीलची भूमिका स्वानंद केतकर याने साकारली आहे. स्वानंद केतकर हा मुंबईतच लहानाचा मोठा झाला. रामणारायन रुईया कॉलेजमध्ये असताना त्याने अनेक राज्यनाट्य स्पर्धा तसेच एकांकिका मधून सहभाग दर्शवला. त्यात त्याला उत्कृष्ट अभिनयाची बक्षिसं देखील मिळाली आहेत. स्वानंदने कलाश्रय संस्थेची स्थापना केली यातून गायन स्पर्धा, म्युजिक वर्कशॉप, वारली आर्ट वर्कशॉप सारखे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले. ‘आपली सोसल वाहिनी’ या सेगमेंटमधून अनेक मजेशीर व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. याचे दिग्दर्शन आणि लेखन स्वतः समीर खांडेकर याने केले आहे.
आजवर सोसल व्हिडिओजना प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यातील काही व्हिडिओत स्वानंद केतकर देखील झळकला होता. अभिनयाची उत्तम जाण असलेल्या स्वानंदला तू तेव्हा तशी मालिकेत झळकण्याची नामी संधी मिळाली आहे. ही त्याची अभिनित केलेली पहिलीच मालिका आहे. या मालिकेत तो सहाय्यक भूमिकेत जरी दिसत असला तरी त्याच्या सहजसुंदर अभिनयाची दखल प्रेक्षकांनी नक्कीच घेतली आहे. त्याचमुळे नीलची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली पाहायला मिळते. आता मालिकेत अनामिका आणि सौरभच्या प्रेमकहाणीसोबतच राधा आणि नीलची प्रेमकहाणी खुलू लागली आहे. नीलच्या भूमिकेसाठी स्वानंद केतकरला मनःपूर्वक शुभेच्छा.