लक्ष्मीकांत बेर्डे आणि निवेदिता जोशी सराफ यांनी अनेक चित्रपटातून एकत्रित काम केले आहे. काही चित्रपटातून या दोघांनी नायक नायिका देखील साकारली आहे. लक्ष्मीकांत बेर्डे आणि निवेदिता सराफ हे दोघेही बालपणापासूनचे खूप चांगले मित्र, त्यामुळे सुरुवातीपासूनच त्यांच्यात खूप चांगलं बॉंडिंग जुळून आलं होतं. अगदी निवेदिता सराफ यांचे लग्न झाले त्यानंतर त्या दहा वर्षे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या घरा शेजारी राहत होत्या. लग्नाअगोदर दौऱ्यानिमित्त रात्री अपरात्री घरी जायला खूप उशीर होणार असेल त्यावेळी निवेदिता सराफ लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या घरी मुक्काम करत असत. एकदा असाच उशीर होणार असल्यामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या घरी मुक्काम घडून आला. त्यावेळी निवेदिता सराफ यांनी त्यांच्या आईला फोन केला.
मी लक्ष्याच्या घरी आहे हे कळविण्यासाठी फोन केला असतानाच आईने फोन उचलल्यावर ‘मी लक्ष्याच्या घरी आहे.’ एवढेच म्हटल्यावर, निवेदिता सराफ यांना समोरच एक मोठे झुरळ दिसले. ते झुरळ पाहून निवेदिता सराफ जोरात किंचाळल्या आणि त्यांनी फोन कट केला. त्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी हजरजबाबीपणा दाखवत तू माझ्या घरी आहेस एवढंच सांगितलंस आणि किंचाळलीस. यावरून तुझ्या आईला काय वाटेल. म्हणून निवेदिताला पुन्हा त्यांच्या आईला फोन करण्यासाठी सांगितले आणि तू झुरळ पाहिल्यावर ओरडलीस हे ही सांगायला लावले. हा भन्नाट किस्सा निवेदिता सराफ यांनी एका मुलाखतीत सांगितला होता. निवेदिता सराफ या अभिनयासोबतच उत्कृष्ट सुगरण देखील आहेत. त्यांचा स्वतःच्या नावाने युट्युबवर रेसिपीजचा चॅनल आहे.
आज अशीच लक्ष्मीकांत बेर्डेच्या आठवणीत त्यांनी त्यांच्या खास आवडीची एक डिश बनवून दाखवली आहे. ही आठवण सांगत असताना निवेदिता सराफ म्हणतात की, लक्ष्मीकांतला एक डिश अतिशय आवडती होती जी तो सकाळच्या नाश्त्याला, दुपारच्या जेवणात, संध्याकाळी चहाच्यावेळी आणि रात्रीच्या जेवणावेळी अशी कधीही ही डिश खायची त्याची तयारी असायची, ती म्हणजे खोबऱ्यातली सुरमई. ही डिश कशी बनवायची याची रेसिपी निवेदिता सराफ यांनी काही वेळापूर्वीच शेअर केली आहे. त्यांनी बनवलेल्या या रेसिपीला अनेक प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. इन्स्टग्रामवरून एक व्हिडिओ शेअर करत असताना आज त्यांनी या खोबऱ्यातल्या सुरमईची खास आठवण सांगितली, जी लक्ष्मीकांत बेर्डे यांना प्रचंड आवडायची.