आपल्या सहजसुंदर विनोदी अभिनयाने अभिनेते अशोक सराफ यांनी गेले कित्येक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. धुम धडाका, गंमत जंमत, भुताचा भाऊ, अशी ही बनवा बनवी, सगळीकडे बोंबाबोंब अशा चित्रपटातून विनोदी भूमिका रंगवण्यासोबत त्यांनी खलनायकी ढंगाच्या भूमिका साकारल्या आहेत. खलनायक साकारणे जितके सोपे तितकेच आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना हसवणे अवघड आहे आणि प्रेक्षकांनी मला विनोदी भूमिकेत स्वीकारले याचे सर्वस्वी आभार मी या तमाम प्रेक्षकांचे मानतो असे अशोक सराफ नेहमी म्हणतात. अशोक सराफ यांच्या सहचारिणी म्हणजेच अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांचा १९९० साली प्रेमविवाह झाला.
निवेदिता सराफ यांचे वडील गजन जोशी हे मराठी चित्रपट सृष्टीत नायक आणि सहाय्यक भूमिका निभावताना दिसले. अशोक सराफ आणि गजन जोशी हे दोघे खूप चांगले मित्र. गजन जोशी यांनी सत्तरच्या दशकात चित्रपट साकारले आहेत. मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेल्या देखण्या हिरो पैकी गजन जोशी यांचे नाव घेतले जाते. गजन जोशी हे देखील त्या काळात देखणे अभिनेते म्हणून परिचित होते. आपल्या मित्राच्या मुलीसोबतच माझे लग्न होईल याचा विचार देखील अशोक सराफ यांनी त्यावेळी केला नव्हता. एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी आपल्या सासऱ्यांबाबत हे वक्तव्य केले होते. गजन जोशी आणि अशोक सराफ यांची खूप चांगली मैत्री होती त्यामुळे एकमेकांना ते एकेरी नावानेच हाक मारायचे.
मात्र आपला मित्र गजन जोशी हा पुढे आपला सासरा होईल ही कल्पना त्यांनी कधीच केली नव्हती. वयाच्या ४२ व्या वर्षीच गजन जोशी यांनी या जगाचा निरोप घेतला होता. त्यांनी दैवाचा खेळ, आधार, सौभाग्य कांक्षिणी, आधार अशा चित्रपटातून काम केले होते. निवेदिता सराफ यांच्या आई विमल जोशी या आकाशवाणीवरील कामगार सभा तसेच वनिता मंडळ या लोकप्रिय कार्यक्रमांचे सादरीकरण करत असत. त्यामुळे आई वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत निवेदिता सराफ या देखील अभिनय क्षेत्रात दाखल झाल्या होत्या. मराठी भाषेवर आणि त्याच्या उच्चारांवर विमल जोशी यांचे प्रभुत्व होते हे गुण त्यांच्या डॉ मीनल परांजपे आणि निवेदिता सराफ या दोन्ही मुलींनी देखील अंगिकारले असे म्हणायला हरकत नाही.