हिंदी बिग बॉसच्या घरात शिव ठाकरे हळूहळू रुळू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून एलिमीनेट झालेला शिव बिग बॉसच्या घरात नाराज दिसत होता. त्यामुळे त्याला खूप एकटेपणा जाणवू लागला होता. बिग बॉसने दिलेल्या एका टास्क दरम्यान शिव ठाकरे दिलखुलास पणे व्यक्त झालेला पाहायला मिळाला. बहुतेकदा टास्क खेळत असताना सदस्यांमध्ये भांडणं होत असतात. वेळ प्रसंगी बाचाबाची, वाद, हाणा मारीपर्यंत पावले उचलली जातात. अर्थात प्रतिस्पर्ध्याला हरवण्यासाठी अशा युक्त्या आखल्या जात असल्यामुळे या घटना प्रत्येक टास्क दरम्यान घडतात. मराठी बिग बॉस असो किंवा हिंदी अशा टास्कमुळेच शो ला अधिक रंगत चढत असते.
प्रतिस्पर्धी तगडा असेल आणि तो खेळाची बाजू समजून घेणारा असेल तर तो एक टास्क टास्क म्हणूनच खेळला गेलेला पाहायला मिळतो. असाच काहीसा अनुभव शिव ठाकरेला मिळाला आहे. नुकताच बिग बॉसने सदस्यांना एक टास्क दिला होता. ज्यात त्या सदस्यांना एक तास डोक्यावर ओझं घेऊन उभं राहायचं होतं. हे ओझं अधिक व्हावं म्हणून शिवने त्यात अधिक वजनाचा भार टाकला होता. शालीन भनोटने हा टास्क अतिशय शिस्तीत खेळलेला पाहायला मिळाला. टास्क दरम्यान शिवने केलेल्या कृत्यावर कुठलाही राग व्यक्त न करता शालीनने कौतुक केलेले दिसले. अर्थात सुरुवातीला शालीन ह्या टास्कमध्ये काहीसा नाराज दिसला. एक तास उभं राहून जर कमी वजन घेऊन तू हा टास्क खेळला असता तर त्याच्यात अजिबात मज्जा आली नसती.
टास्क खेळल्यानंतर मात्र आपण मैत्रीच्या नात्याने पुन्हा एकत्र आलो असतो, हे शिवचे म्हणणे शालीनला चांगले पटले. शिवच्या या स्पष्टीकरणानंतर शालीन शिवचे कौतुक करतो. परंतु या टास्कमुळे जवळच बसलेल्या सुमबुल तौकीर खानने आक्षेप घेतलेला दिसला. एखाद्याच्या मानेला काही इजा होऊ शकते असे सुमबुलचे म्हणणे होते. सुमबुलला थांबवत ‘आम्ही दोघे बोलतोय यात तू बोलू नको’ असे शिव म्हणताच सुमबुलला राग आला आणि तिथून तडकाफडकी निघून गेली. सुमबुल खान हिने इमली मालिकेतून प्रमुख भूमिका साकारली होती. बिग बॉसच्या घरात आल्यामुळे शालीनसोबत सुमबुलचे चांगले सूर जुळू लागले आहेत. शिवने शालीनला त्रास देण्यासाठी असा टास्क खेळला असा समज तिने करून घेतला.
शालीन हा घटस्फोटित आहे, २०१५ साली पत्नी दलजीत कौरशी त्याने घटस्फोट घेतला होता. सुमबुल आणि शालीनमध्ये काहीतरी शिजतंय अशी या दोघांच्या नात्यावर चर्चा सुरू झाली आहे. तसे पाहता सुमबुल आणि शालीन यांच्या वयात खूप अंतर आहे आणि त्यांच्यात असे काहीच नाही असेही बोलले जात आहे. केवळ मैत्रीच्या नात्याने सुमबुलने शालीनची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शिवने तिला सहकार्य न दाखवल्याने सुमबुल काहीशी नाराज झालेली दिसली. आता शिव सुमबुलची समजूत काढणार की त्यांच्यात मतभेद वाढणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.