हिंदी बिग बॉसचा सिजन ह्यावेळी सुमबुल खान आणि शालीनच्या वागण्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. या सोळाव्या सिजनमध्ये सुमबुल, शालीन आणि टीनाच्या प्रेमाचे त्रिकोण प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत. बिग बॉसच्या घरात एन्ट्री केल्यापासूनच शालीन महिला सदस्यांशी जुळवून घेण्याच्या तयारीत दिसला. इमली मालिकेतून प्रसिद्धी मिळाल्यानंतर सुमबुल बिग बॉसच्या घरात दाखल झाली. मात्र शालीनसोबत तिची वाढत जाणारी जवळीक पाहून तिच्या घरच्यांना मध्यस्ती करावी लागली होती. सुरुवातीलाच सुमबुलच्या वडिलांनी बिग बॉसच्या मंचावर येऊन या दोघांची कानउघडणी केली होती.
तरी देखील सुमबुल शालीनच्या प्रेमात आकंठ बुडाली असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. टिनाला ठेच लागली तेव्हा शालीन तिची चौकशी करण्यासाठी तिच्या जवळ गेला मात्र यामुळे मॅक स्टॅन सोबत त्याचा वाद झाला. तेव्हा सुमबुल शालीनला घट्ट मिठी मारताना दिसली. शिव सोबतही शालीनचा वाद झाला तेव्हा देखील सुमबुल शालीनला मिठी मारताना दिसली. नेटकऱ्यांनी सुमबुलच्या वागण्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. घरात काहीही घडलं तरी सुमबुल शालीन सोबत दिसु लागल्याने तिच्यावर टीका करण्यात आली. शुक्रवार की वॉरमध्ये सलमान खानने देखील हाच मुद्दा उपस्थित करून शालीन आणि सुमबुलची कानउघडणी करण्याचा प्रयत्न केला. सुमबुल शालीनच्या प्रेमात वेडी झाली आहे असे सलमान तिला म्हणतो, तेव्हा तो शालीनला याचा जाब विचारतो.
तेव्हा माझ्यात आणि तिच्यात वीस वर्षांचं अंतर आहे, असे म्हणून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो. शालीन टिनाला देखील आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहे. सुमबुलच्या वागण्यामुळे टीना शालीनवर भडकलेली पाहायला मिळाली. शालीन जिथे जाईल तिथे सुमबुल त्याचा पाठलाग करते, आम्हाला भेटू देखील देत नाही असे मत तिने व्यक्त केले. तेव्हा सुमबुल रडायला लागली आणि मला घरी जायचंय असे म्हणाली. तेव्हा सलमान खान सुमबुलला घरी जाण्याची पूर्ण परवानगी देतो. तुला कोणीच थांबवलं नाही असेही तिला सांगतो. शालीन आणि मॅक स्टॅनच्या भांडणात देखील सलमानने मध्यस्ती केली. परंतु हे भांडण एवढे विकोपाला गेले की शालीन या निर्णयावर ठाम होता की एकतर हा तरी घरात राहील नाहीतर मी तरी.