मराठी मालिका सृष्टीतील लाडक्या माई म्हणजेच अभिनेत्री सुकन्या मोने बऱ्याच कालावधीनंतर झी मराठी वाहिनीकडे परतल्या आहेत. आभाळमाया, वादळवाट, जुळून येती रेशीमगाठी, चूक भूल द्यावी घ्यावी या मालिकांनंतर आता अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई या मालिकेत दमदार भूमिकेत दिसत आहेत. त्यांची ही भूमिका रोजच्या पठडीतील नसल्याने त्यांना ती करायला खूप मज्जा येत आहे. या मालिकेच्या निमित्ताने सुकन्या कुलकर्णी यांनी मुलाखत दिली आहे. मुलाखतीत मालिकेची निर्माती म्हणजेच सुबोध भावेची पत्नी मंजिरी भावे हिचे कौतुक करताना त्या थांबत नाहीत.
खरं तर मालिकेत काम केल्यानंतर कामाचे पैसे निर्मात्याला मागावे लागतात. मात्र या मालिकेचा अनुभव खूपच सुखद आहे, हे त्या आवर्जून सांगतात. अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई ही मालिका खूप वेगळी असल्याचे त्या म्हणतात. सासूच्या त्याच त्याच भूमिका समोर आणण्यापेक्षा आताचे विषय समोर आणा हे त्या आवर्जून म्हणतात. अंबाडा साडी नेसणारी टिपिकल सासू आशीच एक तिची प्रतिमा मालिकांमधून तयार झालेली आहे. त्यामुळे आताच्या घडीच्या सासू दाखवल्या जाव्यात, याचे सीमोल्लंघन केलं पाहिजे. माझी आई ८९ वर्षांची आहे पण ती सुद्धा बॉबकट करते. नखांना नेलपॉलिश लावते, ड्रेस घालते तर मग आपण का मालिकेतून टिपिकल आई दाखवायची. नाती तीच असतील पण कुठेतरी या विचारांना छेद जाणं गरजेचं होतं.
झी मराठीने हे माझ्या सोबत घडवून आणलं आहे म्हणून मला ही भूमिका करताना खूप मज्जा वाटते. या बदलामुळे पटकन चेंज होऊन आम्ही पुढच्या सिनला हजर होतो. ही मालिका सुबोध आणि मंजिरी भावे यांनी आणली आहे. सुबोधचा या गोष्टीत हातखंडा आहे मात्र मंजिरी सुद्धा सर्व गोष्टी व्यवस्थित हाताळते हे त्या आवर्जून म्हणतात. मंजिरी सेटवर येताना आमच्यासाठी भरपूर काही खायला घेऊन येते. आमच्या आवडीनिवडी सुद्धा ती बघते. हे सगळं वातावरण नीट ठेवण्याची जबाबदारी आम्हा सगळ्यांची असते. मात्र एक प्रश्न येतो तो म्हणजे पैशांचा. तर बरेचवेळा असे होतं की आम्ही काम करतो पण आम्हाला पैशांसाठी निर्मात्यांना फोन करावे लागतात, मागावे लागतात. अशा वेळेला खूप वाईट वाटतं की आपण त्यांच्यासाठी काम केलंय.
तुम्ही न सांगता आम्ही थांबतो ना! कधी एखादा सिन अर्धवट सोडून नाही जात ना. मग तसं न मागता पैसे द्या की आम्हाला. आम्हाला का मागावे लागतात आमच्या कामाचे पैसे. पण मंजिरीकडे काम करताना आम्हाला कधीच हे करावं लागलं नाही. कान्हाज मॅजिक मधून आम्हाला समोरून चेक येतो. समोरून काही अडचण असेल तर दहा दिवसांत होईल असे सुद्धा सांगण्यात येते. त्यामुळे आम्ही निश्चिन्त असतो. म्हणून मग आम्हाला परत फोन करावा लागत नाही. त्या दृष्टीने सुद्धा मला हे अतिशय चांगलं असं प्रोडक्शन मिळालं. जिथे सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टी प्रेमाने केल्या जातात.