स्टार प्रवाह वाहिनीवर नवनवीन मालिका दाखल होत आहेत. आता प्रेक्षकांना दुपारी देखील नवीन मालिकांचा आस्वाद घेता येणार आहे. येत्या १६ जानेवारी पासून शिभविवाह ही नवी मालिका सोमवार ते शनिवार दुपारी २ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत बऱ्याच प्रतीक्षेनंतर अभिनेत्री मधुरा देशपांडे प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. झी युवा वरील इथेच टाका तंबू या मालिकेनंतर जवळपास चार वर्षानंतर मधुरा मुख्य भूमिका निभावत आहे. तर यशोमन आपटे हा नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री विशाखा सुभेदार या मालिकेतून पुन्हा एकदा एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
कुंजीका काळवींट आणि अभिजित श्वेतचंद्र हे विरोधी भूमिकेत दिसणार आहेत. या मालिकेच्या येण्याने स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे समोर आले आहे. मुलगी झाली हो या मालिकेला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता. या मालिकेने टीआरपीच्या स्पर्धेत काही काळ अव्वल स्थान देखील पटकावले होते. मात्र मालिकेतील विलासची भूमिका साकारणारे किरण माने यांना या मालिकेतून काढून टाकण्यात आले. सेटवर कलाकारांसोबत गैरवर्तन केल्याने किरण माने यांची मालिकेतून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र हा वाद अधिक चिघळल्याने मालिका संपवावी अशी मागणी त्यांच्या चाहत्यांकडून करण्यात येऊ लागली.
वाद मिटल्यानंतर काही दिवसातच मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला. आता या मालिकेत शौनकचे लग्न होणार आहे. त्याच्या आईने साजिरीच्या वडिलांना तसे निमंत्रण देखील दिले आहे. गोजिरी ही आपलीच मुलगी आहे ही बाब शौनकला समजली आहे. त्यामुळे हे लग्न होणार की नाही असा प्रश्न मालिकेच्या प्रेक्षकांना पडला आहे. आता नवीन मालिकेच्या आगमनामुळे मुलगी झाली हो ही मालिका आटोपती घेण्यावर भर दिला जात आहे. मालिकेचा शेवट सकारात्मक दाखवला जाणार असल्याने शौनक आणि साजिरी अखेर एकत्र येणार अशी आशा प्रेक्षकांना आहे. यात महत्वाचं म्हणजे कधीही न बोलणारी साजिरी आता मालिकेच्या अखेरच्या टप्प्यात बोलताना दाखवणार आहे. त्यामुळे मालिकेच्या शेवटच्या भागाची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे.