Breaking News
Home / मराठी तडका / माझ्यावर झालेले हे सर्व आरोप माझ्या प्रतिमेला धक्का देणारे आहेत… श्रेयस तळपदेने केला खुलासा
shreyas talpade explanation
shreyas talpade explanation

माझ्यावर झालेले हे सर्व आरोप माझ्या प्रतिमेला धक्का देणारे आहेत… श्रेयस तळपदेने केला खुलासा

अद्वैत थेटर संस्थेचे निर्माते राहुल भंडारी यांनी ‘मला न विचारता आलबत्या गलबत्या या नाटकाचा सेट सुरेश सावंत आणि अभिनेता श्रेयस तळपदे यांनी त्यांच्या भक्षक या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील व्यावसायिक नाटकासाठी वापरला’…अशी तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. शिवाय शासनाचे सर्व नियम डावलून चित्रीकरण केले असाही आरोप श्रेयस तळपदे याच्यावर लावण्यात आला. मात्र माझ्यावर झालेले हे सर्व आरोप अत्यंत निंदनीय आहेत असे परखड स्पष्टीकरण देत श्रेयस तळपदे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांचे खंडीकरण केले आहे. आपल्यावर झालेल्या आरोपांवर श्रेयस तळपदेने खुलासा करून सांगितले आहे की…

shreyas talpade explanation
shreyas talpade explanation

या साथीच्या काळात मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती रंगभूमी तसेच इतर भाषांमधील आणखी काही रंगभूमींशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक घटकाला आर्थिक पाठबळ देण्याचे काम ‘नाईन रसा’ या माझ्या ओटीटी प्लॅटफॉर्मने काम केले. परंतु, या प्लॅटफॉर्मची वाढती लोकप्रियता काही लोकांच्या डोळ्यात आता खुपू लागली आहे. तसा प्रकार नुकताच घडला आहे. नाट्यनिर्माते राहुल मधुकर भंडारे यांनी आपल्या ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकातील सेट चोरीला गेला असून तो आमच्या प्लॅटफॉर्मवरील ‘भक्षक’ नावाच्या एका एकांकिकेत वापरला गेल्याचा आरोप माध्यमांकडे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. यासंदर्भात त्यांनी पोलिसांकडे तक्रारही दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी थेट माझ्या नावाचा उल्लेख केल्याने त्याबाबत काही गोष्टी मी स्पष्ट करू इच्छितो. पहिली गोष्ट म्हणजे ‘नाइन रसा’वर सादर झालेली विविध भाषांमधील सर्व नाटके किंवा एकांकिकांच्या सादरीकरणाची जबाबदारी व्यावसायिक निर्मात्यांवर सोपवण्यात आली आहे. त्यांच्याशी आम्ही एक रितसर करार करतो. त्यामध्ये नाटकाशी संबंधित विविध हक्क तसेच इतर गोष्टींचा समावेश असतो. हे निर्मातेच आपल्या कलाकृतीमध्ये कोणते नेपथ्य वापरायचे आहे, याचा निर्णय घेतात. त्याच्याशी ‘नाइन रसा’ या प्लॅटफॉर्मचा काहीच संबंध नसतो. आमच्या प्लॅटफॉर्मसाठी ‘भक्षक’ या नाटकाची निर्मिती प्रसिद्ध निर्माते-अभिनेते सुशांत शेलार यांच्या कंपनीतर्फे करण्यात आलेली आहे. त्यामुळे ‘भक्षक’मध्ये वापरलेला सेट हा नवीन आहे की अन्य कोणाचा आहे, तो आमच्या एकांकिकेत कोठून आला याची मला वैयक्तिकरित्या काहीच कल्पना नाही. त्यामुळे भंडारी यांना सेटबद्दल काही आक्षेप असतील तर त्यांनी आधी या एकांकिकेचे निर्माते श्री. सुशांत शेलार यांच्याशी संपर्क साधायला हवा होता. तसे न करता त्यांनी या प्रकाराबद्दल थेट मला वैयक्तिकरित्या जबाबदार धरून पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रकार अत्यंत अनुचित आणि माझ्या समाजातील प्रतिमेला धक्का देणारा आहे.

shreyas talpade with family
shreyas talpade with family

दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये गेल्या काही महिन्यांपासून आमच्या विविध भाषांमधील कलाकृतींचे चित्रीकरण सुरू आहे. करोना काळात रंगभूमीवरील व्यावसायिक नाटकांच्या प्रयोगांच्या सादरीकरणाला बंदी असली तरी ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी काही अटी आणि शर्तींसह नाटक-एकांकिकांच्या चित्रीकरणास परवानगी होती. त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने आखून दिलेल्या सर्व अटी आणि नियमांचे पालन करूनच आम्ही हे चित्रीकरण केले आहे. त्यासाठी पोलीस, महापालिका आदी यंत्रणांची रितसर परवानगी आम्ही घेतलेली आहे. त्याबद्दलची सर्व कागदपत्रे आमच्याकडे आहेत. तसे आम्ही केले नसते तर सावरकर स्मारकाच्या व्यवस्थापनाने आम्हाला त्यांचे सभागृह चित्रीत करण्याची परवानगी दिली नसती. हे वास्तव असूनही श्री. राहुल भंडारी यांनी प्रसिद्धी माध्यमांकडे पाठविलेल्या पत्रामध्ये आम्ही सावरकर स्मारकामध्ये बेकायदा चित्रीकरण केल्याचा आणि नियमांचा भंग केल्याचा आरोप केला आहे. हा आरोपदेखील धादांत खोटा आहे. हे सर्व आरोप असूयेपोटी केले असावेत, असे मला वाटते. कारण दीड वर्षांपूर्वी करोनाची साथ आल्यानंतर मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती रंगभूमीवरील नाटकांचे प्रयोग बंद झाले होते. त्यामुळे तिथं काम करणाऱ्या कलाकार, तंत्रज्ञ तसेच कामगारांचा रोजगार गेला. अशा विपरित परिस्थितीमध्ये रंगभूमीसाठी गौरवशाली ठरेल अशा ‘नाइन रसा’ या नवीन ओटीटी प्लॅटफॉर्मची मी निर्मिती केली. केवळ रंगभूमीला वाहिलेला हा जगामधील एकमेव ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मसाठी आम्ही गेल्या वर्षभरात १०० तासांहून अधिक ‘कॉन्टेन्ट’ चित्रीत केला आहे. तो चित्रीत करण्याच्या निमित्ताने आम्ही निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ, लेख, कामगार अशा दोन हजारहून अधिक लोकांना रोजगार मिळवून दिला.

shreyas talpade actor
shreyas talpade actor

अनेक नवीन कलाकार, तंत्रज्ञांना आपण या काळात त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी दिली. संपूर्ण रंगभूमी अशी आर्थिक अडचणीत असताना अशा प्रकारे ‘नाइन रसा’द्वारे रंगभूमीशी निगडीत असणाऱ्यांना हात देण्यात आला. तसे करताना आमच्याकडून सर्व अटी, नियम, सूचनांचे पालन करण्यात आले. या सगळ्या मंडळींनी त्याबद्दल ‘नाइन रसा’चे कौतुक केले आहे. आजपर्यंत कोणीही तक्रारीचा सूर आळवलेला नव्हता. एवढे सगळे विधायक काम केल्यानंतर अशा प्रकारचे आरोप होणे हे अत्यंत निंदनीय आहे. त्यामुळे नेमके काय घडलेय, याची शहानिशा न करता थेट माझ्यावर असे बिनबुडाचे आरोप करणे, हे योग्य नाही. ‘नाईन रसा’ प्लॅटफॉर्मची वाढती लोकप्रियता लक्षात आल्यामुळेच कदाचित ‘चीप पब्लिसिटी’च्या दृष्टीने असे आरोप झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे झाल्या प्रकाराबाबत श्री. भंडारे यांच्याविरुद्ध कायदेशीर प्रक्रियेद्वारे मानहानीचा दावा करण्याचाही मी विचार करीत आहे. धन्यवाद ,आपला – श्रेयस तळपदे.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.