झी मराठी वरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तितिक्षा तावडे या मालिकेत नेत्राची भूमिका साकारत आहे. पुढे काय घडणार हे नेत्राला अगोदरच समजते, त्यामुळे आगळे वेगळे कथानक असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांनी आपलेसे केलेले आहे. मालिकेत ऐश्वर्या नारकर यांनी विरोधी भूमिका साकारली, त्यामुळे प्रेक्षकांचा त्यांच्यावर रोष आहे. लवकरच मालिकेत एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. नेत्राचे बालपण मालिकेतून उलगडणार असल्याने, या मालिकेत बालकलाकाराची एन्ट्री झाली आहे. नेत्राच्या भूमिकेत झळणाऱ्या या बालकलाकाराबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात.
नेत्राच्या बालपणीच्या भूमिकेत झळकणाऱ्या मुलीचे नाव आहे श्रावी पनवेलकर. श्रावी पनवेलकर हिची ही बालकलाकार म्हणून दुसरी मालिका आहे. याअगोदर तिने स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत काम केले होते. यात ती रुहीची मुलगी म्हणजेच अनन्याच्या भूमिकेत दिसली होती. आता झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतून श्रावीला पुन्हा एकदा अभिनयाची संधी मिळाली आहे. श्रावीची आई आणि वडील दोघेही कलाकार आहेत. त्यामुळे अभिनयाचे बाळकडू तिला घरातूनच मिळालेले आहे. श्रावी ही पिंकीचा विजय असो या मालिकेतील छबी ताई म्हणजेच अभिनेत्री अंकिता जोशी पनवेलकर हिची मुलगी आहे. अंकिताने आजवर अनेक मालिका तसेच नाटकांमधून अभिनय साकारला आहे.
शुभमंगल ऑनलाइन, बाळू मामाच्या नावानं चांगभलं या मालिकेतून तिने महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. पिंकीचा विजय असो मालिकेतील तिची सकारात्मक भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली आहे. तर श्रावीचे बाबा म्हणजे ओम पनवेलकर हे देखील अभिनेते आहेत. तसेच कार्यकारी निर्माता म्हणून अनेक चित्रपट आणि मालिकांसाठी त्यांनी काम केलेले आहे. श्रावीला अभिनयासोबत डान्सची देखील आवड असून आपल्या आईसोबत ती नवनवीन रील बनवताना दिसते. मराठी मालिका सृष्टीत प्रभावी बालकलाकार म्हणून श्रावीने पाऊल टाकलं आहे. सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत तिला नेत्राची मध्यवर्ती भूमिका मिळाली आहे. लवकरच तिची मालिकेतून एन्ट्री होणार असल्याने नेत्राचा भूतकाळातील प्रवास पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक झाले आहेत.