स्वातंत्र्य लढ्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमातून डफावर थाप मारत शाहिरी ललकारी देत महाराष्ट्राची परंपरा सर्वदूर पोहचवली. ती खऱ्या अर्थाने शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांनी. शाहीर साबळे यांच्या गाण्यांवर महाराष्ट्रानेच नाही तर जगाने भरभरून प्रेम केलं. त्यांचं महाराष्ट्र गीत असो, खंडोबाचा जागर किंवा कोळी गीत प्रत्येक गाणं हे काळजात हात घालणारं ठरलं आहे. शाहीर साबळे यांनी महाराष्ट्राला दिलेली ‘महाराष्ट्राची लोकधारा’ आजही अनेकांच्या स्मरणात आहे. त्यांच्या पश्चात हा वारसा त्यांचा नातू म्हणजेच दिग्दर्शक केदार शिंदे पुढे नेत आहेत आणि आता शाहीर साबळे यांच्या जीवनावर ते चित्रपट करत आहेत.
या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी संभाजीनगर येथे झालेल्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख श्री राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी केदार शिंदे, अंकुश चौधरी उपस्थित होते. यावेळी ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाचा टिझर देखील दाखवण्यात आला. शाहीर साबळे यांच्या भूमिकेत चॉकलेट हिरो अंकुश चौधरी असल्याचे जाहीर होताच चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केलेला पाहायला मिळाला. हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाला अजय अतुल यांचे संगीत लाभले आहे. मात्र शाहीर साबळेंच्या भूमिकेसाठी अंकुश चौधरी योग्य नसल्याचे अनेक मेसेजेस केदार शिंदे यांना येऊ लागले. या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच केदार शिंदे यांनी एक स्पष्टीकरण दिले आहे.
‘प्रत्येक जण मला विचारतोय की अंकुश चौधरी महाराष्ट्र शाहीर या भूमिकेसाठी कसा योग्य आहे? तो खुप वेगळा दिसतो. काहींनी हे पोस्टर पाहून अंकुशला ओळखलं सुध्दा नाही. नीट पाहा फोटो अंकुशचा आहे, ही कमाल विक्रम गायकवाड टीम यांची. जगदीश येरे यांच्याकडून हा लूक निर्माण झाला आहे. युगेशा ओंकार हीने याचे कॉस्ट्युम्स केले आहेत. लोकीस सचिन मारुती लोखंडे, अतुल जनार्दन तरकार यांनी या सिनेमाचं पोस्टर डिझाईन केलं आहे. ही सुरूवात आहे, अजून बराच पल्ला आम्हाला गाठायचा आहे. पण प्रत्येक गोष्ट याच पॅशनने करून हे शिवधनुष्य आम्ही नक्कीच पेलू. आपले आशीर्वाद असू द्यात, श्री स्वामी समर्थ’.
चित्रपटाचे पोस्टर लॉन्च करण्यात आले त्याचवेळी अंकुश चौधरीचा शाहीर साबळे यांच्या गेटअपमधला एक फोटो प्रसिद्ध करण्यात आला होता. या पोस्टरमध्ये शाहीर साबळे आणि अंकुश चौधरी यांच्यात बरेचसे साम्य आढळून आले. मुळात आजवर अंकुशला कॉलेज तरुण भूमिकांमधून प्रेक्षकांनी पहिले आहे. त्यामुळे अनेकांनी हा फोटो ओळखलाच नसल्याचे मान्य केले आहे. खरं तर ही कमाल मेकअप आर्टिस्टची आणि लुकवर मेहनत घेणाऱ्या कलाकारांची आहे हे केदार शिंदे आवर्जून सांगताना दिसतात. त्यामुळे या भूमिकेसाठी अंकुश चौधरीचा योग्य आहे असे मत आता अनेक प्रेक्षकांनी मांडले आहे.