झी मराठीवरील चला हवा येऊ द्या सोडून बहुतेक सर्वच मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यामुळे नव्या दमाच्या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यासाठी झी मराठी वाहिनी वेगवेगळे प्रयोग घडवून आणताना दिसत आहे. बस बाई बस, डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स या रिऍलिटी शो सोबत तू चाल पुढं. अप्पी आमची कलेक्टर, नवा गडी नवं राज्य अशा नव्या दमाच्या मालिका झी मराठी वाहिनीने प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. यात आता आणखी एका नव्या मालिकेची भर पडणार आहे. येत्या १२ सप्टेंबर २०२२ पासून रात्री १०.३० वाजता ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही नवी मालिका प्रसारित केली जाणार आहे. त्यामुळे देवमाणूस २ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे निश्चित झाले आहे.
देवमाणूस २ या मालिकेत देवीसिंग उर्फ अजितकुमार देव आता लवकरच जामकरच्या तावडीत अडकणार आहे. डॉक्टरची सर्व कारस्थानं आता गावकऱ्यांना देखील समजणार असल्याने ही मालिका अखेरच्या टप्प्यावर येऊन ठेपलेली पाहायला मिळणार आहे. देवमाणूस या मालिकेच्या यशानंतर मालिकेचा सिक्वल काढण्यात आला होता. मात्र डॉक्टरांची कट कारस्थानं पाहून प्रेक्षकांनी या मालिकेवर नाराजी दर्शवली होती. जामकरच्या येण्याने मालिकेला वेगळे वळण मिळाले. डॉक्टर जामकरच्या तावडीत सापडेल अशी खात्री वाटत असतानाच मात्र त्यातही ट्विस्ट आणल्याने प्रेक्षकांची घोर निराशा झाली. त्यामुळे प्रेक्षकांचा पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने ही मालिका आता आटोपती घेण्यावर भर दिला जात आहे.
देवमाणूस २ या मालिकेच्या जागी आता सातव्या मुलीची सातवी मुलगी ही नवी मालिका पाहायला मिळणार आहे. झी मराठीची ही नवीन मालिका त्रिणयनी या बंगाली मालिकेचा रिमेक असणार आहे. अभिनेत्री तितिक्षा तावडे हिला बऱ्याच प्रतीक्षेनंतर मालिकेतून पुन्हा मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळत आहे. काळ्या जिभेमुळे गावातले लोक अडचणीत येतात ‘ती बोलते ते घडत नाही, जे घडणार आहे ते ती बोलते’. अशी ही आगळीवेगळी कहाणी तितिक्षा तावडे प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहे. सरस्वती, तू अशी जवळी रहा, असे हे कन्यादान या मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नुकतेच सोनी मराठीवरील ज्ञानेश्वर माऊली या मालिकेत संत कान्होपात्राची व्यक्तिरेखा तिने साकारली होती. तितिक्षा सोबत प्रणिता आचरेकर, अद्वैत दादरकर या मालिकेत झळकणार आहेत.