संकट काळात मदतीला धावून येणारा, मैत्रीच्या नात्यात निखळ आनंद देणारा असा एक मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात हवा असतो. मन उडू उडू झालं या मालिकेतील इंद्रा आणि सत्तूची मैत्री देखील अशाच नात्यावर टिकून आहे. त्याचमुळे हा सत्तू वेळप्रसंगी इंद्राच्या मदतीला धावून आलेला पाहायला मिळाला. इंद्रा गुंड आहे असा त्याच्या आईने समज करून घेतला आहे. मात्र प्रत्यक्षात तो किती कष्टाळू आणि प्रामाणिक आहे. त्याला जबाबदारीची किती जाणीव आहे याची आठवण या सर्वांना सत्तूने करून दिली आहे. सत्तूचा हाच निरागसपणा प्रेक्षकांना देखील खूपच भावला आहे. मन उडू उडू झालं या मालिकेतला सत्तू अनाथ आहे मात्र त्याला इंद्रा आणि त्याच्या आईने आसरा आहे.
सत्तू आपल्याच कुटुंबातील एक सदस्य म्हणून हे दोघे त्याची काळजी घेताना दिसतात मात्र कार्तिक सानिकाकडून त्याचा पदोपदी अपमान झालेला पाहायला मिळाला. या सत्तूची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराने त्याच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. ही भूमिका साकारली आहे विनम्र भाबल या कलाकाराने. सत्तूची भूमिका अगदी त्याच्या नावाप्रमाणेच विनम्र आहे असे म्हणायला हरकत नाही. विनम्र भाबल हा मूळचा देवगडचा. मुंबई युनिव्हर्सिटी मधून पदवीचे शिक्षण घेत असताना त्याने रंगभूमीवर एकांकिकामधून काम करण्यास सुरुवात केली. परंतु मनासारखे कुठे काम मिळत नव्हते. दरम्यान नाट्यशिबिरातून लेखक दिग्दर्शक असलेल्या संभाजी सावंत यांच्याशी ओळख झाली.
त्यांनी मोलाचे मार्गदर्शन देत डेंगो या मालवणी नाटकात छोटीशी भूमिका देऊ केली. परंतु पुढे जाऊन व्यावसायिक नाटकात किमान छोटी तरी भूमिका मिळावी अशी ईच्छा चित्रगंधा या नाटकातून पूर्ण झाली. पुढे मंगेश कदम दिग्दर्शित करत असलेल्या बेईमान या नाटकात प्रथमच झळकण्याची नामी संधी चालून आली. एकांकिकेतून काम करत असल्याने मंदार देवस्थळी एका स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम सांभाळत होते. त्यांनीच विनम्रला कुठलीही ऑडिशन न घेता माझे पती सौभाग्यवती या मालिकेत मोठी भूमिका देऊ केली. या मालिकेमुळे विनम्रला अमाप लोकप्रियता मिळाली. फुलपाखरू, मोरूची मावशी, स्वीटी सातारकर, रेडू, ये रे येरे पैसा अशा मालिका, नाटक आणि चित्रपटातून विनम्रने अनेक महत्वपूर्ण भूमिका साकारल्या.
मन उडू उडू झालं मालिकेतील त्याने साकारलेला सत्तू प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवत आहे. या भूमिकेमुळे त्याला आता प्रेक्षक सहज ओळखू लागले आहेत. विनम्रला पुस्तक वाचनाची अत्यंत आवड आहे फेसबुकवर त्याने वाचनवेडा हे पेज सुरू केले आहे. वाचन वेडावर लोकं पुस्तकं, पुस्तकांच्या संग्रहाबद्दल नवनवीन माहिती शेअर करत असतात. त्याच्या नावाने त्याने एक युट्युब चॅनल देखील सुरू केले आहे. या युट्युब चॅनलवर तो वेगवेगळे धमाल किस्से तो शेअर करताना दिसतो. त्याच्या या व्हिडिओजला देखील प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. विनम्र भाबल या हरहुन्नरी कलाकारास पुढे देखील भरघोस यश मिळो हीच सदिच्छा.