मला काहीतरी होतंय, मला कसंतरी होतंय! आजकाल सारख्ं कसंतरी होतंय ही वाक्य आपण अगदी सहज कधी ना कधी बोलून जातो. पण आता याच वन लाइन स्टोरीवर अख्खे दोन अंकी नाटक रंगमंचावर येणार आहे. त्याची सुरूवात या नाटकातील त्रिकूटाला सारखं काहीतरी होतय या फिलिंगने झाली आहे. सोशल मिडियाच्या उत्सुकतेचा पुरेपूर वापर करत या नाटकातून एकत्र आलेल्या त्रिकूटाने सारखं काहीतरी होतंय म्हणत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्याची पहिली घ्ंटा वाजवण्यात बाजी मारली आहे. आता या नाटकाची तिसरी घ्ंटा कधी वाजणार याकडे लक्ष लागले आहे.अभिनेता प्रशांत दामले, अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि लेखक अभिनेता संकर्षण कऱ्हाडे या त्रिकूटाची भटटी जमली आणि त्यातून हे नाटक साकारले आहे.
सारखं काहीतरी होतंय या नावापासूनच औत्स्युक्याची सीमा गाठणारया या नाटकाचा ढोल सध्या सोशलमीडियावर जोरात वाजायला सुरूवात झाली आहे. नुकताच प्रशांत दामले, संकर्षण कऱ्हाडे आणि वर्षा उसगावकर यांनी या नाटकाचा डिजिटल प्रोमो सोशलमीडियावर शेअर केला आहे. आपण काहीतरी वेगळं करूया का असं एकमेकांना विचारत असतानाचा हा रंजक प्रोमो नाटकाचा पडदा उघडण्यापूर्वीच नाट्यप्रेमींपर्यंत पोहोचला आहे. नाटक असो, मालिका असो, सिनेमा असो किंवा वेबसिरीज असो, प्रत्यक्षात स्क्रिनवर येण्यापूर्वी त्यासाठी हटके प्रमोशन फंडा वापरण्याचा ट्रेंड जोरात आहे. त्यामुळे या नाटकाची जाहिरात सध्या तरी कल्पकपणे सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी प्रशांत दामले यांनी फेसबुकवर, काय करूया आता. वास तर येतोय, सारखं काहीतरी होतंय असा टीझर पोस्ट केला होता. ते नेमकं काय होतं याचा उलगडा न करत नाटकाच्या टीमने अजूनही उत्सुकता कायम ठेवत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या नाटकाची अनेक वैशिष्ट्य आहेत, यामध्ये प्रशांत दामले आणि वर्षा उसगांवकर हे तब्बल ३६ वर्षांनी नाटकात एकत्र काम करणार आहेत. तर या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी संकर्षण कऱ्हाडे याने घेतली आहे. प्रत्यक्ष आयुष्यात पक्के खवय्ये असलेले प्रशांत आणि संकर्षण यांची जोडगोळी सध्या किचन कल्लाकार या कार्यक्रमात मनोरंजनाचे कारंजे उडवत आहे.
तर सुख म्हणजे काय असतं या मालिकेत नंदिनी शिर्केपाटील यांच्या भूमिकेत वर्षा उसगांवकर या दहा वर्षांनी छोट्या पडद्यावर दाखल झाल्या आहेत. संकर्षण कऱ्हाडे याची माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील समीरची भूमिका लोकप्रिय झाली असून तू म्हणशील तसं या नाटकाचे प्रयोगही सुरू आहेत. आता हे त्रिकूट नेमकं काय होतंय ते नाटकातून सांगणार आहेत. रसिक मायबाप प्रेक्षकांना या त्रिकुटाची मेजवाणी चाखण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे हे नक्की.