अभिनय क्षेत्रात काम करत असताना कलाकारांना मोठी मेहनत घ्यावी लागत असते. एखादा स्टंट करत असताना तो त्याच्या जीवावरसुद्धा बेतू शकतो, अशा घटना अनेकदा घडलेल्या पाहायला मिळतात. मोठमोठे कलाकार कुठलाही स्टंट करत असताना डमी आर्टिस्टची मदत घेतात पण मराठी सृष्टीत हे फार कमी वेळा घडते. त्यामुळे कलाकाराला त्याचे १०० टक्के देणे भाग असते. अजिंक्य राऊत हा मराठी सृष्टीतला एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. विठू माऊली या मालिकेमुळे अजिंक्य प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. मन उडू उडू झालं मालिकेत त्याचा डॅशिंग अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला.
नुकताच त्याचा प्रमुख भूमिका असलेला सरी हा चित्रपट अमेझॉन प्राईमवर प्रसारित करण्यात आला आहे. सोबतच तो सोनी मराठीवरील अबोल प्रीतीची अजब कहाणी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे सध्या तो प्रमोशन निमित्त धावपळ करताना दिसतो आहे. नुकतेच एका प्रोजेक्टमध्ये काम करत असताना अजिंक्यला एक स्टंट करावा लागला. हा स्टंट करत असताना तो त्याच्या जीवावरच बेतला होता. सेटवर असतानाच अजिंक्यला तीव्र वेदना जाणवू लागल्या असल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लांबचा प्रवास आणि तासनतास काम करत असल्याने स्टंट करत असताना त्याला तीव्र वेदना जाणवू लागल्या. तब्येतीवर त्याचा मोठा परिणाम जाणवत होता. पण एक अभिनेता म्हणून त्याने शो मस्ट गो ऑन म्हणत दिलेले काम पूर्ण केले.
यात महत्वाचं म्हणजे निर्मिती टीम आणि चॅनलने अजिंक्यची काळजी घेण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट त्याने एवढ्यासाठीच सांगितली की आपल्या जीवपेक्षा दुसरं काहीही मोठं नाही. त्यामुळे स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका असे तो म्हणतो. अजिंक्य राऊतने सोशल मीडियावर त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात तो उपचार घेताना दिसत आहे. त्याची अशी अवस्था पाहून मराठी सृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी काळजी व्यक्त केली आहे. सोबतच अजिंक्यला लवकरात लवकर बरे वाटावे म्हणून काळजी घेण्यास सांगितले आहे. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर अजिंक्य पुन्हा एकदा आपल्या कामाकडे परतणार आहे. येत्या १७ जुलै पासून त्याची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे अजिंक्य लवकरात लवकर रिकव्हर होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.