प्रेक्षकांची इच्छा असेल तर मालिका सृष्टीत काहीही घडू शकते याचे दाखले देणारे अनेक उदाहरणे तुम्हाला पाहायला मिळतील. झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतेय हे कळताच प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली होती. मालिका चालू ठेवा असे आवाहन करण्यात येत होते. प्रेक्षकांच्या याच आग्रहाखातर मालिका पुन्हा एकदा सुरळीत चालू झाली. अर्थात हा प्रेक्षकांचा दबाव नाही तर त्या मालिकेप्रति प्रेम होते म्हणूनच प्रेक्षकांची मागणी लक्षात घेऊन वाहिनीने पुन्हा ही मालिका चालू करणार असल्याचे निश्चित केले होते.
मात्र आता असाच एक अनुभव पुन्हा एकदा अनुभवायला मिळत आहे. आजवर अध्यात्मिक मालिकांना प्रेक्षकांनी मोठी पसंती दर्शवली होती. सन मराठी वाहिनीवरील संत गजानन शेगावीचे ही मालिकाही त्यातलीच एक. काही महिन्यांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. मात्र याच प्रेक्षकांच्या आग्रहाखातर आता ही मालिका पुन्हा एकदा नवीन एपिसोड्स घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. संत गजानन शेगावीचे या मालिकेत अमित सुभाष फाटक याने प्रमुख भूमिका साकारली होती. या भूमिकेने अमितला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. भक्तगण अमितला गजानन महाराजांच्या रूपातच ओळखू लागले होते. हे या मालिकेप्रति प्रेक्षकांचे प्रेम होते.
मालिकेने अनेक वर्षांचा लीप घेतला त्यानंतर मात्र अमितने या पात्राचा निरोप घेतला. त्यानंतर ही भूमिका ज्येष्ठ अभिनेते मनोज कोल्हटकर साकारू लागले. काही भागाचे प्रक्षेपण झाल्यानंतर मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण आता प्रेक्षकांच्या आग्रहाखातर ही मालिका येत्या १७ सप्टेंबर पासून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सन मराठी वर दर रविवारी रात्री ९ वाजता मालिकेचे एक तासाचे नवीन भाग दाखवले जाणार आहेत. अमित फाटक पुन्हा एकदा गजानन महाराजांची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झालेला आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी देखील आपली मागणी पूर्ण होतेय हे पाहून आनंद व्यक्त केला आहे.