संकर्षण कऱ्हाडे लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित नियम व अटी लागू नाटकाचा शुभारंभ आजपासून करण्यात आला. या नाटकात संकर्षण कऱ्हाडे, अमृता देशमुख आणि प्रसाद बर्वे प्रमुख भूमिका साकारत आहे. संकर्षण या नाटकासोबतच तू म्हणशील तसं हे नाटकही करत आहे. त्यामुळे सध्या नाटकांच्या दौऱ्यात त्याची धावपळ सुरू आहे. तू म्हणशील तसं नाटकात संकर्षण कऱ्हाडे सोबत अभिनेत्री काजल काटे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. काजल काटे हिच्या येण्याने नाटकात बदल घडून आला. मात्र काजलने ही भूमिका उत्तम निभावली अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून मिळत आहे. काजलच्या जागी ही भूमिका अभिनेत्री भक्ती देसाई साकारत होती.
मात्र प्रेक्षकांनी पसंती दर्शविलेले तू म्हणशील तसं हे तिने निभावलेलं नाटक का सोडले, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होता. आपण एखादी भूमिका साकारतो ती समरसून जगतो तेव्हा दुसऱ्या कलाकाराला त्याऐवजी पाहणे प्रेक्षकांना थोडेसे जड जात असते. मालिका सृष्टीत तर असे बदल अनेकदा घडतात. पण त्याजागी तगड्या कलाकाराची एन्ट्री होते तेव्हा त्याचे वेगळेपण काही काळापुरतेच मर्यादित राहते. पण नाटकाच्या बाबतीत असे मुळीच घडताना दिसत नाही. कारण बघणारा प्रेक्षक हा दरवेळी वेगवेगळा असतो. त्यामुळे त्याच्यासाठी हा बदल गौण मानला जातो. त्यामुळे संकर्षणचे नाटक आजही प्रेक्षकांची तेवढीच दाद मिळवत आहे. पण भक्तीने हे नाटक सोडण्याचे कारण नुकतेच समोर आले आहे. भक्तीकडे एक नवा प्रोजेक्ट आलेला आहे. त्याचमुळे तिने या नाटकाला रामराम ठोकला आहे.
झी मराठी वाहिनीवर येत्या २७ मार्चपासून चंद्रविलास ही नवीन मालिका प्रसारित होत आहे. मालिकेत भक्ती महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. भक्तीसोबत मालिकेत वैभव मांगले, सागर देशमुख, आभा बोडस असे कलाकार दिसणार आहेत. भक्ती देसाई हिने आजवर अनेक मालिका, चित्रपटातून उत्तमोत्तम भूमिका साकारल्या. एखादा नवीन प्रोजेक्ट आणि तोही झी मराठीचा असेल तर कलाकार अशा भूमिका साकारण्यास नेहमीच उत्सुक असतात. भक्तीने या मोठ्या प्रोजेक्टसाठीच नाटक सोडल्याचे समजते. त्यामुळे तिच्या जागी काजल काटे हिची वर्णी लागलेली पाहायला मिळते. चंद्रविलास मालिकेत कथानकाची आणि भक्तीची भूमिका काय असेल याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच आहे. नवीन भूमिकेसाठी आणि नवीन मालिकेसाठी भक्तीला शुभेच्छा.