कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत लवकरच एक सकारात्मक ट्विस्ट आलेला पाहायला मिळणार आहे. इतके दिवस मालिकेतील लतिका वेगवेगळ्या संकटांना सामोरे जात होती. आपल्या मुलीचा सांभाळ करताना तिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. अभ्याच्या निधनानंतर लतीकाचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. मात्र यात तिच्या घरच्यांची आणि देवाची तिला साथ मिळाली होती. मालिकेच्या महारविवार विशेष भागात आज एक अनपेक्षित ट्विस्ट आलेला आहे. इतके दिवस मालिकेतून गायब असलेला अभ्या पुन्हा एकदा लतिकासमोर येत आहे. आपल्या बाबांच्या आठवणीत लतीकाची मुलगी भावुक होते.
अदिराला शाळेत एक चिठ्ठी निवडायची असते. या चिठ्ठीत लिहिलेल्या व्यक्तीवर तिला बोलायचे असते. बाबा हे नाव समोर येताच लतिकाची मुलगी रडायला लागते. तेव्हा समोरून एक व्यक्ती येऊन ती चिठ्ठी उचलतो. हा व्यक्ती म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून अभ्या आहे. अभ्याची या मालिकेत एन्ट्री झाल्याने मालिकेचा ट्रॅक पुन्हा एकदा रुळावर आला अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांनी देण्यास सुरुवात केली आहे. मालिकेचे बरेच चाहते अभ्याच्या भूमिकेवर प्रेम करत होते. अभ्याची एक्झिट झाली त्यावेळी प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. ही भूमिका साकारणारा समीर परांजपे मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनमध्ये सहभागी होणार असे बोलले जात होते. त्याचमुळे त्याने मालिकेतून काढता पाय घेतला अशी चर्चा त्यावेळी रंगली होती.
मात्र या मालिकेनंतर समीर कुठल्याच प्रोजेक्टमध्ये दिसला नव्हता. मालिकेचा एक ट्रॅक संपल्यामुळेच त्याला मालिकेतून काही काळासाठी दूर जावे लागले होते. अभ्याच्या जाण्याने लतिका एकाकी पडली होती. त्यानंतर मालिकेत देवव्रतचे पात्र आले. देवव्रत आणि लतीकाने दौलतच्या कटकारस्थानाचा फडशा पाडला. दौलतला कायमची जेलची हवा खायला पाठवले. तेव्हा लतिका देवासोबत लग्न करणार आणि पुन्हा आपला संसार थाटणार अशी चर्चा सुरू झाली. मात्र ही चर्चा सुरू असतानाच आता मालिकेत अभ्याची एंट्री झालेली पाहायला मिळाली. अभ्याच्या येण्याने मालिकेला खरा रंग चढला आहे अशी प्रतिक्रिया आता प्रेक्षकांकडून मिळत आहे. त्यामुळे नाराज प्रेक्षक पुन्हा एकदा मालिकेकडे वळले आहेत.