मालिका अधिक रंजक करण्यासाठी त्यात नवनवीन ट्विस्ट आणले जातात. स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेला देखील असेच एक धक्कादायक वळण मिळाले आहे. मालिकेला आजवर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. जयदीप आणि गौरीच्या संघर्षाची कहाणी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. याचमुळे मालिकेत आणखी एक ट्विस्ट आणला जात आहे. आता ही मालिका काही वर्षांचा लीप घेणार आहे. जयदीप आणि आपल्या लेकीच्या शोधात गौरी हतबल झाली आहे. मात्र जयदीप आणि तिची लेक ‘लक्ष्मी’ आता मोठी झालेली पाहायला मिळणार आहे.

गौरी जयदीप आणि लक्ष्मीचा शोध कसा घेणार, हे येत्या काही भागातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो या मालिकेत देखील असाच एक ट्विस्ट आणण्यात आला होता. तूर्तास सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत गौरी आणि जयदीपच्या मुलीच्या भूमिकेत बालकलाकाराची एन्ट्री झाली आहे. तिच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात. साइशा साळवीला बाल कलाकार म्हणून जाहिरात आणि मालिकांमधून प्रसिद्धी मिळाली. पिंकीचा विजय असो या मालिकेत ओवीची नटखट भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. साईशा साळवी ही चाईल्ड मॉडेल देखील आहे. साईशाचे अनेक रील, व्हिडिओज प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले आहेत.

साईशाचे आई वडील पुण्यात वास्तव्यास आहेत. श्वेता साळवी आणि हेमंत साळवी या दाम्पत्यास दोन कन्या आहेत. हेमंत साळवी हे हॉटेल व्यावसायिक असून ; साईशा ही त्यांची थोरली लेक आहे. साईशा अवघ्या ४ वर्षांची आहे पण एवढ्या कमी वयातच तिने मॉडेलिंग क्षेत्रात उंच भरारी घेतलेली पाहायला मिळत आहे. लहान मुलांच्या कपड्यांच्या विविध ब्रॅण्डसाठी साईशाने काम केले आहे. विविध मंचावर तिने रॅम्पवॉक करत उपस्थितांची मने जिंकली आहेत. हेन्को केअर, पी एन जी ज्वेलर्स, बेलम्याक अशा विविध व्यावसायिक जाहिरातीतून साईशा टीव्ही क्षेत्रात झळकली आहे. टाइम्स फॅशन विक, बॉलिवूड फॅशन विक यासारख्या मोठ्या मंचावर साईशा गेल्या काही वर्षांपासून रॅम्पवॉक करताना दिसते.
साईशा या सर्व यशाच्या पाठीमागे साईशाची आई श्वेता साळवी यांची भक्कम साथ आहे. याच प्रसिद्धीचा फायदा म्हणून साईशा आता अभिनय क्षेत्रात देखील काम करताना दिसते. पिंकीचा विजय असो या मालिकेतून साईशाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. आता सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत ती जयदीप आणि गौरीच्या मुलीची म्हणजेच लक्ष्मीची भूमिका साकारत आहे. या नवीन भूमिकेसाठी साईशाचे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.