गेल्या दोन दिवसांपासून गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर ह्यांच्या लग्नाची लगबग सुरू झालेली पाहायला मिळत आहे. जुईलीच्या घरी काल गृहमख पूजन करण्यात आले होते. त्यानंतर रोहित आणि जुईली यांनी हळदीचा सोहळा आपापल्या घरीच साजरा केलेला पाहायला मिळाला. त्यांच्या हळदीचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. हळदीच्या वेळी जुईलीच्या घरी तिची खास मैत्रीण म्हणजेच अभिनेत्री मिताली मयेकर चांदेकर हिने हजेरी लावली होती. २३ जानेवारी २०२२ रोजी ११ वाजून ०९ मिनिटांच्या मुहूर्तावर जुईली आणि रोहित राऊत विवाहबंधनात अडकणार आहेत. त्याअगोदरच्या दोन दिवसांमध्ये मेहेंदीचा सोहळा आणि संगीत सोहळा संपन्न होणार आहे.
त्यांच्या लग्नाला त्यांनी काही मोजक्याच मित्रमंडळींना आमंत्रित केले आहे. पुण्यातील प्रसिद्ध ढेपे वाडा या ठिकाणी येत्या रविवारी रोहित जुईली लग्नाचा सोहळा पार पडणार आहे. ढेपेवाडा हे ठिकाण मराठी सेलिब्रिटींचे लग्न सोहळ्यासाठीचे आवडते ठिकाण बनले आहे. याअगोदर मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांचेही लग्न इथेच पार पडले होते. याशिवाय मृण्मयी देशपांडे आणि स्वप्नील राव, तसेच जय मल्हार मालिका फेम सुरभी हांडे आणि दुर्वेश यांचा देखील लग्नाचा सोहळा ढेपे वाड्यातच पार पडला होता. त्यामुळे या वाड्याला सेलिब्रिटी कडून लग्नसोहळ्यासाठी विशेष पसंती मिळताना दिसत आहे. याच कारणास्तव जुईली आणि रोहितने देखील त्यांच्या लग्नसोहळ्याचा खास क्षण ह्याच वाड्यात करणार असल्याचे निश्चित केले आहे.
रोहित जुईली यांची ओळख झाली ती सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या मंचावर. जुईली फायनल पर्यंत मजल मारू शकली नाही, मात्र रोहित राऊतने अंतिम पाचच्या यादीत आपले नाव कोरले होते. त्यानंतर हे दोघेही विविध रिऍलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत राहिले. मराठी सृष्टीत संगीत क्षेत्रात गायक म्हणून स्वताची ओळख निर्माण करत हे दोघेही स्थिरावलेले पाहायला मिळतात. सारेगमप पासूनची त्यांची मैत्री आता नात्याच्या बंधनात अडकताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करून प्रेमात असल्याचे जाहीर केले होते. डिसेंबर महिन्यातील केळवण निमित्त सर्वांनी शुभेच्छा दिल्या होत्या. रोहित आणि जुईलीच आयुष्याच्या नवीन प्रवासासाठी खूप शुभेच्छा.